सावधान ! जुनी गाडी घ्यायची, तर अशी घ्या काळजी

प्रमोद चौधरी
Tuesday, 20 October 2020

मार्केटमध्ये येणारे प्रत्येकच वाहन सुरक्षित असते याची हमी नाही. अनेकदा अपघात झाल्याने नको असलेल्या, चोरीच्या, दस्तावेज नसलेल्या गाड्यांचा यात भरणा असतो.

नांदेड : गेल्या काही वर्षात शहरामध्ये जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या आॅटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजघडीला जुन्या गाड्या विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या १० ते १५च्या घरात आहे. सामान्य वर्गातील ग्राहकांकडून अशा गाड्यांना अधिक मागणी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अलिकडे तरुण पिढीत नवनवीन मोटारसायकल चालविण्याची क्रेझ आहे. मार्केटमध्ये कंपन्यांनी जी नवी गाडी लॉंच केली, ती श्रीमंत व उच्च-मध्यम वर्गातील मुलांना हवी असते. ही चैन पुरविण्यासाठी त्यांचे पालकही मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे वर्ष, दोन वर्षे वापरलेली मोटारसायकल विकून त्याऐवजी नव्या कोऱ्या गाड्या घेतल्या जातात. अशा गाड्या शोधणारे दलालसुद्धा त्यासाठी टपून बसलेले असतात. परंतु, मार्केटमध्ये येणारे प्रत्येकच वाहन सुरक्षित असते याची हमी नाही. अनेकदा अपघात झाल्याने नको असलेल्या, चोरीच्या, दस्तावेज नसलेल्या गाड्यांचा यात भरणा असतो.

हे वाचा - नांदेड शहरातील पंधरा खासगी कोविड सेंटरमधे केवळ १५१ पॉझिटिव्ह सोमवारी १०१ जण पॉझिटिव्ह पाच मृत्यू

चांगला नफा देणारा व्यवसाय
दुकानांमध्ये ठेवलेल्या गाड्यांपैकी बहुतांश गाड्या या बाहेरून आलेल्या असतात. त्यामुळे या वाहनांची गॅरंटी कमी असते. कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणारा व्यवसाय म्हणून अनेकांनी यात शिरकाव केला आहे. नव्या गाड्या विकून शोरूममालकांना मिळणाऱ्या लाभापेक्षा अधिक कमाई हे जुन्या गाड्यांचे विक्रेते करीत आहेत. शिताफीने ग्राहक हेरण्यात त्यांचा हातखंडा असून एकदा ग्राहक दुकानात शिरताच त्यांना अत्यंत सफाईने गाडी विकली जाते. 

हे देखील वाचाच - हिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ

सजगता बाळगणे आवश्यक
जुन्या गाड्यांची खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा चोरीच्या किंवा भंगार झालेल्या गाड्यासुद्धा चकरचकीत करून ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. बनावट दस्तावेज देऊन दिशाभूल करण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. सेकंडहॅण्ड गाडी घेणे सोपे असले तरी दुकानदारांवर विसंबून तसेच खातरजमा न केल्यास आपली फसगत होऊ शकते.

येथे क्लिक कराच - Video - माहूरगडाप्रमाणेच माता रत्नेश्वरीही नांदेड जिल्ह्याचे आराध्य दैवत

नवीन गाड्यांची खरेदी महागली
सणासुदीच्या दिवसांत नवीन गाड्या खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. परंतु, गेल्या महिन्यांपासून नवीन वाहन खरेदी महागली आहे. नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा व मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक केला आहे. नवीन नियमामुळे तीन व पाच वर्षांच्या विम्याचे शुल्क एकत्रित द्यावे लागते. त्यामुळे नवीन वाहनांची खरेदी अंदाचे तीन ते पाच टक्के महागली आहे. त्यामुळेही ग्राहकांचा जुन्या वाहनांच्या खरेदीकडे कल दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If You Want To Buy An Old car Two Wheeler Take Care Nanded News