esakal | वाई बाजारात संचारबंदी लागू मात्र देशी दारू विक्री नियम मुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

liquor

वाई बाजारात संचारबंदी लागू मात्र देशी दारू विक्री नियम मुक्त

sakal_logo
By
साजिद खान

वाई बाजार (नांदेड) : संचारबंदीमध्ये अत्यावशक सेवा वगळता इतर संपूर्ण आस्थापना ताळेबंद घोषित करण्यात आले आहे. मात्र वाई बाजार येथील बियर बार चालक शासनाचे आदेश झूंगारून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या नाकावर टिच्चून बेकादेशीर रित्या देशी दारूची विक्री अवाच्या सव्वा दरात खुलेआम करत आहेत. एका गावावरून दुसऱ्या गावाला भाजीपाला आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दूध पुरवठ्याअभावी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. परंतु बंदी असताना देखील देशी दारू चढ्या दराने वाई बाजारला सहज उपलब्ध होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून साथरोग नियंत्रण कायदा संचार बंदीमध्ये जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाई बाजारमध्ये सिंदखेड पोलिसांच्या परिश्रमाने साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. नागरिक ही स्वयंस्फूर्तीने संचारबंदी व तसेच जमावबंदीचे नियम पाळत आहेत. परंतु वाई बाजारमध्ये फळांचे रस विक्रेते व कोल्ड्रिंक दुकानासह फेरीवाल्यांनी पोलिसांची धास्ती घेतल्याचे दिसून येते. मात्र पारंपारिक दारू विक्रेत्यांवर संचार बंदीचा फारसा परिणाम दिसून येत नाही. बंदी असलेली देशी दारूची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण करून 80 रुपये किमतीची 180 एमएलची पावती 200 रुपयाला विक्री केली जात आहे. त्यामुळे देशी दारूचे भाव अचानक वधारले आहे.

हेही वाचा: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर

वाई बाजारमधील जुन्या बस थांबावरील बियर बारमधून तर गावातील प्रत्येक गल्लीबोळात देशी दारू खुलेआम विक्री केली जात आहे. राज्यात सर्वत्र दारू विक्री व वाहतूक बंद असताना वाई बाजारात देशी दारूची अयात होते तरी कशी हे समजण्यास मार्ग नाही. या दारूची विक्री करणारे नवीन कोणी नसून येथील बियर बार व्यावसायिकच देशी दारू विक्री करताना पाहायला मिळत आहे.

शासनाचा महसूल बुडवून बंद बारमध्ये खुलेआम देशी दारूची विक्री होत असताना धाडसी कारवायांसाठी नाव नवलौकिक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवट व नांदेड कार्यालयाच्या शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वाई बाजार येथील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांची संपूर्ण कुंडली आहे. परंतु अर्थपूर्ण संबंधातून सर्व काही आलबेल आहे. त्यामुळेच संचार बंदीमध्ये देखील देशी दारू मात्र नियमन मुक्त असल्याची प्रचिती येत आहे.

या प्रकारावर आळा घालण्यासाठी संचारबंदी पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नांदेड, सहायक जिल्हाधिकारी किनवट यांनी नागरिकांसाठी अपायकारक, दाजाहिन व बनावट देशी दारूच्या बेकायदेशीर विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी दारू विक्रेत्यांविरुद्ध महसूल विभागाच्या पथकामार्फत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

loading image