शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन

प्रल्हाद कांबळे
Friday, 17 July 2020

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाइन करणे शक्य नसल्याने त्या ऑफलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

नांदेड :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सन 2020- 21 या वर्षातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाइन करणे शक्य नसल्याने त्या ऑफलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुधारित धोरणानुसार सदर बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होत्या. मात्र कोवीड या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सन 2020- 21 मध्ये त्या विहित कालावधीत ऑनलाइन करणे शक्य नसल्याचे निदर्शनास येत असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑफलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात यावी. जिल्हांतर्गत ऑफलाइन बदल्यांची प्रक्रिया पार पाडताना कोरोनाचा प्रादुर्भाव संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. अर्ज घेण्याच्या वेळी सामाजिक अंतर पाळले जाईल   याची दक्षता घ्यावी.

आंतरजिल्हा बदल्या या 15% मर्यादेपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या 15% मर्यादेपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बदल्यांच्या संदर्भातील हे आदेश फक्त 31 जुलैपूर्वी करावयाच्या बदल्यांसाठी लागू राहतील असेही राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स. न. भांडारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आंतरजिल्हा बदल्या प्रचलित धोरणानुसार ऑनलाइन पद्धतीने
 
आंतरजिल्हा बदल्या ऑफलाइन पद्धतीने होणार. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या यंदा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्या तरी आंतरजिल्हा बदल्या प्रचलित धोरणानुसार ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत.

हेही वाचा -  नांदेड जिल्हा आरोग्य विभागाचा असाही कारभार, स्वॅब अहवालास प्रचंड विलंब

साडेतीन लाखांच्या दागिन्यांसह चोरटा गजाआड

नांदेड - घरी कुणी नसल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीस भोकर पोलिसांनी बुधवारी अटक केले. त्याच्याकडून तीन लाख 37 हजार 575 रुपयांचे सोने व चांदीचे दागिणे जप्त करून त्याला न्यायालयाससमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठवले आहे.

 तीन लाख 37 हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा ऐवज

शहरातील वडारगल्ली येथील एसटी वाहक अवधूत गंगाधर रोयलवाड हे आपल्या कुटुंबासह राहत्या घराचे कुलूप लावून ता. 22 जून रोजी बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने मोबाइल व   रोख रक्कम असा एकूण तीन लाख 37 हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.

आरोपी अशोक खंडू नक्कलवाड (वय19)

याबाबत अवधूत गंगाधरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ता. 25 जून रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे फिरवून चोरट्यांचा शोध घेण्यात आला. आरोपी शोधण्यात पोलिसांना   यश आले. ता. 15 जुलै रोजी आरोपीच्या घरातून एका पिशवीमध्ये ठेवलेले सोने-चांदीचे दागिणे मिळून आले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डेडवाल, पोलीस कृष्णा तलवारे, ज्ञानेश्वर सरोदे ,प्रकाश श्रीरामे यांनी परिश्रम घेतले. आरोपी अशोक खंडू नक्कलवाड (वय19) राहणार नंदीनगर, भोकर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inter-district transfers of teachers offline nanded news