बापरे...! विवाहितेच्या अंगावर टाकले उकळते गोडतेल

प्रल्हाद कांबळे
Monday, 10 August 2020

विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या अंगावर उकळते गोडतेल टाकण्‍याचा धक्कादायक प्रकार माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. नऊ) उघडकीस आला.

नांदेड : ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी माहेराहून चार लाख रुपयांची मागणी करून एका विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या अंगावर उकळते गोडतेल टाकण्‍याचा धक्कादायक प्रकार माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. नऊ) उघडकीस आला. या प्रकरणी पती व सासरच्या मंडळीनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती असती की, माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या युवतीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या आडगाव येथील युवकासोबत रीतीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नानंतर तिला सासरी आडगाव येथे काही दिवस चांगले नांदवले. परंतु नंतरच्या काळात तिला सासरी त्रास देणे सुरू केले. ता. २७ मे २०२० रोजी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास त्या विवाहितेसोबत पतीने वाद घालून तिला मारहाण केली.

हेही वाचा नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या श्रीगणेश मंडळांसाठी काय आहेत सूचना ? वाचा...

चार लाखासाठी करत होते छळ

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये घेऊन ये असा मागील काही दिवसापासून ते सतत तगादा लावून तिचे मानसिक व शारीरिक छळ करत होते. सासरी होणारा हा त्रास पीडित विवाहितेने आपल्या माहेरी कळविला होता. परंतु माहेरच्या मंडळीची परिस्थिती बेताची असल्याने चार लाख रुपये कुठून द्यायचे या विवंचनेत तिचे माहेरची मंडळी होती. यातच ती सरचा त्रास सहन करत होती. ता. २७ मे रोजी तिचा पती महावीर जाधव याने तिच्याशी वाद घालुन चक्क तिच्या अंगावर उकळते गोडतेल टाकले. यात ती गंभीर भाजली आहे. तिच्यावर विष्णुपूरी येथील कै. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पतीला नातेवाईकांचा होती मदत

हे क्रुर कृत्य करण्यासाठी त्याला रंजनाबाई जाधव, पंडित जाधव, यशवंत जाधव, माया शिंदे, रोहिणी जाधव, हनुमंत शिंदे आणि इतर नातेवाईकांनी मदत केली. जखमी वाहितेच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलिस ठाण्यात विवाहितेचा छळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रुबा घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री कीर्तने करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It will boil and sweeten the body of the bride nanded news