esakal | कंधार : खचलेला बळीराजा पिकविम्याच्या प्रतीक्षेत

बोलून बातमी शोधा

file photo}

त्यामुळे आर्थिक विवंचनेतून खचलेला बळीराजा आता पिकविम्याच्या प्रतीक्षेत असून पल्लवित झालेल्या अपेक्षांना आधार मिळणार का?असा प्रश्न शेतकऱ्यांनातुन उपस्थित केला जात आहे.

कंधार : खचलेला बळीराजा पिकविम्याच्या प्रतीक्षेत
sakal_logo
By
विठ्ठल चिवडे

कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : लहरी निसर्ग, अनियमित पर्जन्यमान आणि तीच ती परंपरागत शेती परिणामतः प्रतिवर्षी उत्पन्नात येणारी घट यातून दिवसेंदिवस शेतीव्यवसाय तोट्यातच ही भीती अधिकच गडद होत असून मागील चार- पाच हंगामापासून कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून खचलेला बळीराजा आता पिकविम्याच्या प्रतीक्षेत असून पल्लवित झालेल्या अपेक्षांना आधार मिळणार का?असा प्रश्न शेतकऱ्यांनातुन उपस्थित केला जात आहे.

कंधार तालुक्यातील कुरुळा व दिग्रस महसूल मंडळात प्रत्येकी अठरा गावांचा समावेश होतो. खरीप हंगाम २०२०- २१ मध्ये सदरील मंडळात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिके प्रभावीत झाली होती. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तालुका कृषी आणि महसूल विभागाकडून क्षेत्रनिहाय पंचनामे होऊन तुटपुंजे अनुदान मंजूर झाले. हाती येणारा घास निसर्गाने हिरावल्यामुळे जेमतेम लागवड खर्चही निघणे आता मुश्किल झाल्याचे चित्र आहे. कोरोनाने आधीच हात बांधले त्यात अस्मानी संकट यामुळे शेतकरी पुरता खचला असून पिकविम्यातून आर्थिक आधाराची गरज आहे.

क्षेत्रनिहाय पीक कापणी प्रयोगातून अंतिम आणेवारी ४३ पैसे आल्याने दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले. तद्नंतर तूर आणि कापूस पिकाच्या उत्पन्नातून जेमतेम लागवड खर्च निघेल अशी अपेक्षा असतानाच तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि अपेक्षेवर पाणी फेरले. कृषी विभागाच्या सूचनेनुसार बाधित पिकांच्या मोजक्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या परंतु त्यापैकी काही शेतकऱ्यांनाच विमा कंपनीकडून आर्थिक लाभ झाला. ऑनलाईन तक्रारीपासून अनभिज्ञ अडलेल्या शेतकऱ्यांना आता पिकविम्याची आस लागली आहे.

एकीकडे जगभर कोरोनाच्या महामारीने जग बंदिस्त होते. परंतु बळीराजा मात्र पाचवीलाच पुजलेल्या संघर्षात मातीतल्या कामात गुंतलेला होता. निसर्गाच्या दुष्टचक्राने उत्पन्नावर नांगर फिरवल्याने पिकविम्यातून जगण्याचा आधार मिळावा अशी कुरुळा आणि दिग्रस मंडळातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेलेला हंगामाने खूप निराश केलं आहे. लागवडीचा खर्च जास्त झाला उत्पन्न कमी होऊन आर्थिक नुकसान झाले. गत वर्षी खूपच कमी प्रमाणात विमा मिळाला. शेतपडीचे पैसेही खूपच कमी आलेत आता पीकविमा भेटला तर बर होईल.
-आनंद कदम,शेतकरी नागलगाव.

संपादन- प्रल्हाद कांबळे