esakal | हृदयद्रावक! गरिबीचा भार मुलांच्या खांद्यावर; बैल नसल्याने स्वतःच तिफणीला जुंपून पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

हृदयद्रावक! गरिबीमुळे बैल नसल्याने स्वतःच तिफणीला जुंपून पेरणी

sakal_logo
By
विठ्ठल चिवडे

कुरुळा (नांदेड): एक एकर खडकाळ जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह. अशातच घरातील कर्त्या पुरुषाचे दुर्धर आजाराने निधन झाले. आता एक मुलगी अन् दोन मुलांचे पोट कसे भरणार, असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. शेतात खरिपाची पेरणी करावी तर बैल नाही. ट्रॅक्टरचे भाडे देण्यासाठीही पैसे नाहीत. पण, रडत-कुढत बसण्याऐवजी तिच्या शाळकरी मुलांनी गरिबाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. स्वतःला बैलाप्रमाणे तिफणीला जुंपून घेतले. ही हृदयद्रावक संघर्षगाथा आहे ती आबादीनगर तांडा येथील सखुबाई माधव चव्हाण (वय ४३) यांच्या कुटुंबाची.
सखुबाई यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. दोन मुलं अन् एका मुली सोबत त्या परिस्थितीशी दोन हात करीत आहेत.

पण, म्हणतात ना जगात सगळ्या गोष्टीचे सोंग आणता येते मात्र पैशाचे नाही. याची प्रचिती या कुटुंबाकडे पाहिल्यावर येते. प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या एक एकर खडकाळ जमिनीवर खरिपाची पेरणी करून हिरवे स्वप्न फुलवण्याची जिद्द सुखबाई अन् तिच्या मुलांमध्ये आहे. पण, पेरणीसाठी या कुटुंबाकडे ना बैल होते ना ट्रॅक्टरचे भाडे देण्यासाठी पैसे. त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. सखुबाईंची दोन मुले अजय आणि विजय यांनी स्वतःला बैलाप्रमाणे तिफणीला जुंपून घेतले अन् पेरणी केली. सुखबाईंनीही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून धरणी मायेची ओटी भरली.

हेही वाचा: मराठवाड्यातील शिक्षणाची पायामूळं

रील लाइफ नव्हे रियल लाइफ
सखूबाई अन् तिच्या कुटुंबाची ही संघर्षगाथा ख्यातकीर्त दिग्दर्शक महबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’तील काही प्रसंगाप्रमाणे वाटत असली तरी ती रील नव्हे रियल लाइफ आहे. ‘मदर इंडिया’तील नायिकेप्रमाणे सखूबाई यांनाही आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. पण, परिस्थितीमुळे या चिमुकल्यांवर कुटुंबाचा भार येऊन पडला आहे. अजय हा दहावीत तर विजय सातवीत शिकत आहे. मुलगी चौथीत आहे. या कुटुंबाला समाजातील दानशुरांची मदत हवी आहे.

loading image