अपहरणकर्ता विकास हटकरच्या पोलिस कोठडीत वाढ

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 12 August 2020

अट्टल गुन्हेगार विकास हटकर याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. त्याला गुरुवार (ता. १४) ऑगस्टपर्यंत परत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

नांदेड : लोहा येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण प्रकरणात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेला अट्टल गुन्हेगार विकास हटकर याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. त्याला गुरुवार (ता. १४) ऑगस्टपर्यंत परत पोलीस कोठडीत पाठवले आहे. तर त्याच्या दोन साथीदारांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

लोहा बालाजी मंदीर परिसरात राहणाऱ्या शुभम गिरी व त्याच्या मावसभावाचे दोन किलो सोन्याच्या आमिषापायी अट्टल गुन्हेगार विकास हटकरने अपहरण केले होते. त्यानंतर हटकर हा या मुलांना घेऊन पुयनी शिवारात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली होती. त्यांनी आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ता. सात ऑगस्ट रोजी त्याला पोलिसांनी शिताफीने सापळा लावून घेरले. यानंतर विकास हटकर हा शुभमला घेऊन पळत सुटला होता.

हेही वाचा -  धक्कादायक : पतीचा अपघातात मृत्यू, मात्र घडले भलतेच, काय आहे प्रकरण वाचा...

दोन्ही बालकांची केली होती सुटका

पोलिसांनी त्याला थांबण्याचे सांगितले. परंतु त्याने पुढे याल तर शुभमला मारुन टाकेन अन्यथा आपल्यावर हल्ला कररण्यात येईल. अशी धमकी दिली. यानंतर मात्र पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. यात तो जखमी झाला होता. त्यानंतर लगेच अपहरण केलेल्या शुभम आणि त्याच्या मावस भावाची सुटका करण्यात आली.

गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

जखमी विकास हटकर व अन्य दोघांना अटक केली होती. या तिघांनाही सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी (ता. ११) पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने श्री. हटकर याला १४ आॅस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे तर इतर दोघांची तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश दिले. यातील बाकी फरार आरोपींच्या शोधात एक पथक रवाना करण्यात आले असून त्यांनाही लवकरच अटक करु असा विश्‍वास श्री. चिखलीकर यांनी बोलून दाखविला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapper Vikas Hatkar's police custody increased nanded news