विष्णुपूरी धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रल्हाद कांबळे
Sunday, 27 September 2020

शनिवारी रात्रीपासून ते रविवारी (ता. २७) सकाळपर्यंत विष्णुपूरीतून मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीवर असलेला नावघाट पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

नांदेड : जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्ग हा थेट गोदावरीतून विष्णुपूरी धरणात येत आहे. तसेच धरणाच्या वरच्या भागात सातत्याने सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीत पाण्याचा आवक वाढतच आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून ते रविवारी (ता. २७) सकाळपर्यंत विष्णुपूरीतून मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीवर असलेला नावघाट पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून नदी किनारी जीवरक्षक, पोलिस आणि महसुलचे पथक तैणात करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गोदावरीचे दहा दरवाजे उघडून ९१ हजार ८५१ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीही तब्बल दहा दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे नांदेड शहरासह परिसरात पुराचा धोका निर्माण झाला होता. ता. २६ सप्टेंबर रोजी जायकवाडी पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ७५ हजार ५५० विसर्ग गोदावरीत करण्यात येत आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्पातून सात हजार १३० क्युसेक्स विसर्ग पूर्णा नदीत करण्यात येत आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून १८ हजार ३० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी, सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातून पूर्णा नदीत दोन हजार ५३१  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते? ते वाचाच

जायकवाडीचे पाणी वेगाने विष्णुपूरीकडे

या सर्व नद्यांचे पाणी गोदावरीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग हा एक लाख तीन हजार १३० एवढा आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास मात्र विसर्गात वाढ करावी लागण्याची शक्यता आहे. सध्या नांदेड शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. धरणाच्या खालील बाजूस आलेल्या तेलंगणातील पोचमपाड धरण शंभर टक्के भरले असून त्यातून ७५ हजार क्युसेक्स पाण्याचा वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. शनिवारी दुपारपासून ते रविवार सकाळपर्यंत विष्णुपुरी धरणातून मोठा विसर्ग सुरु आहे.

येथे क्लिक कराजागतिक पर्यटन दिन - श्री साईंबाबांच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारूपास 

 पुरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज

त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या जुन्या पुलावर पाणी पातळी ३४५. ७० मीटर आहे. तर धोक्याची पातळी ३५१ मीटर आहे. या प्रकल्पातून आठ हजार ५५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. निम्न मानार प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्याआहेत. रविवारी सकाळी पुन्हा एकदा विष्णुपूरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून नदी दुथडी भरून वाहत आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोदावरी जीव रक्षक दल आणि पोलीस दल तसेच महसूल विभागही सज्ज असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large discharge from Vishnupuri dam, warning to riverside villages nanded news