जाणून घ्या : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्कचे महत्त्व- डॉ. गंगाधर घुटे

file photo
file photo

नांदेड : समस्त मानव जातीच्या जिवावर उठलेल्या कोरोना आजाराचा प्रसार आपल्या देशात विशेषतः आपल्या राज्यात वेगाने होत आहे. कोरोना बाधितांची संख्या व मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. संचारबंदी, टाळेबंदी यासारख्या उपयोजना करुन देखिल हा आजार मोठ्या शहरातून जिल्ह्याच्या ठिकाणी व तेथून थेट खेड्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यासाठी मास्क वापरणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. मास्कचा जर आफण नित्यनेमाने वापर केला तर नक्कीच येणाऱ्या काळात कोरोनावर मात करणे शक्य होईल असे मत डॉ. गंगाधर घुटे यांनी सांगितले.

येणारा काळ आपल्यासाठी कसोटीचा ठरणार आहे. कारण शासन एका मर्यादेपर्यंतच संचारबंदी, टाळेबंदी सारख्या उपाययोजना करु शकणार आहे. आणि येत्या काळात यामध्ये शिथिलता येवू शकते कारण शासनाला कोरोनाशी लढण्याबरोबरच देशाची आर्थिक बाजू देखील सांभाळावी लागणार आहे.

नागरिक मास्कचा वापर करत आहेत त्या देशांमध्ये कोरोना व कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांचा प्रसार मंद गतीने

त्यामुळेच येणाऱ्या काळत देशाच्या प्रत्येक नागरिकाने या आजारापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी वैयक्तिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाशी दोन हात करतांना ईतर उपाययोजना बरोबरच चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे. मास्कच्या वापराविषयी जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देशातील आरोग्य विभाग तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ डॉक्टर्स, शास्त्रज्ञ यांच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जागतिक पातळीवर विषाणूजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी मास्कच्या वापराविषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास (Random Control Trial-RCT) झालेला नाही. परंतु ज्या देशातील सर्व सामान्य नागरिक मास्कचा वापर करत आहेत त्या देशांमध्ये कोरोना व कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांचा प्रसार मंद गतीने होतो आहे असे निदर्शनास आले आहे.

उदा जपान, हॉंकॉग, दक्षिण कोरिया या देशातील सर्वसामान्य नागरिक सर्रासपणे मास्कचा वापर करत आहेत आणि या देशांमध्ये कोरोना आजाराचा प्रसार देखील मंद गतीने होतो आहे.

मास्कचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत

1) N-95 मास्क- या प्रकारात मोडणारा मास्क वातावरणा तील साधारणतः 95% दूषित कनांपासून आपले सरंक्षण करतो. (याशिवाय N-90,N-100 मास्क अनुक्रमे 90% आणि 99.97% दूषित कनांपासून आपले सरंक्षण करतात  )
हा मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसतो व कुठूनही दुषित हवा आपल्या श्वसन संस्थेत प्रवेश करत नाही. N-95 मास्कमध्ये पाच थर असतात.
आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय, कोरोना बाधित व्यक्तींशी ज्यांचा सम्पर्क येऊ शकतो अशा कुठल्याही व्यक्ती (उदा. पोलिस, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, अन्नधान्य, औषधे वाटप करणारे सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते, कोरोना बधितांचा सर्वे करणाऱ्या व्यक्ती) यांच्यासाठी हा मास्क उपयुक्त आहे. अशा कोरोनाचा धोका असणाऱ्या व्यक्तीनी हा मास्क जास्तीत जास्त एक दिवस वापरावा व त्यानंतर याचा पुनर्वापर करू नये दुसऱ्या दिवशी नवीन N-95 वापरावा. कारण कोरोनाबाधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असल्यामुळे अशा व्यक्तीना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
थोडक्यात सांगायचे म्हणजे N-95 मास्क हा पहिल्या फळीतील कोरोना योध्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या प्रकारचा मास्क सरसकट सर्व जनतेने वापरण्याची आवश्यकता नाही.

2) कापडी मास्क :- या प्रकरचा मास्क कापडा पासून बनवण्यात येतो व हा मास्क आपण स्वतः सहजपणे घरीही बनवू शकतो. कॉटन मिक्स कपड्या पासून बनविलेला कापडी मास्क दोन किंवा तीन लेअरचा बनविल्यास वातावरणातील दूषित कनांपासून (विषाणू, जिवाणू) पासून 70% पर्यंत आपले संरक्षण करतो. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सरसकट सर्वांनी वापरण्यासाठी या प्रकरचा मास्क अत्यंत उपयुक्त आहे. एकदा चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारणतः तीन तासांपर्यंत हा मास्क आपले कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. त्यानंतर साबणाने स्वच्छ धुवून सुकविल्यानंतर आपण पुन्हा हा मास्क वापरू शकतो. चेहरा आणि विशेषतः नाक या मास्कने व्यवस्थित झाकल्यास हा मास्क आपला कोरोनापासून बचाव करु शकतो. अगदी कमी किमती मध्ये तयार होणार हा मास्क सर्वांना वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

3) सर्जिकल मास्क :- या प्रकारतील मास्क हा मुख्यत्वेकरुन ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करतांना डॉक्टर्स व त्यांचे सहकारी यांच्यासाठी वापरण्यात येतो. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये या मास्कची विशेष उपयुक्तता नाही. खूपच पातळ असलेल्या एक लेअरच्या मास्कमधून कोरोनाचे विषाणू वापरणाऱ्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेपर्यंत सहज पोहोचू शकतात. त्यामुळे हा मास्क वापरु नये. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा मास्क उपलब्ध नसेल अशावेळी आपला चेहरा, नाक व्यवस्थित झाकल्या जाईल अशा प्रकारे रुमाल बांधून घेतल्यास देखील आपले कोरोना आजारापासून संरक्षण होऊ शकते. सर्जिकल मास्क वापरण्यापेक्षा रुमाल वापरणे उपयुक्त आहे.

N-95 मास्क, कापडी मास्क किंवा रुमाल दर तीन तासांनी साबणाने स्वच्छ धुवून आणि सुकवुन किंवा सॅनिटाइझ करुन परत वापरता येऊ शकतात.

मास्क वापरतांना घ्यावयाची काळजी

  • मास्क घालण्यासाठी मास्कला स्पर्श करण्यात अगोदर आपले हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत किंवा सॅनिटाइझरने स्वच्छ करावेत.
  • मास्क पाठीमागे व्यवस्थित बांधून घ्यावा.
  • एकदा मास्क घातल्या नंतर तो परत काढू नये व मास्कला वारंवार स्पर्श करु नये.
  • मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसवावा जेणेकरुन चेहरा व मास्कमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप राहता कामा नये.
  • घरी परतल्यानंतर मास्क पाठीमागे बांधलेल्या दोरी किंवा इल्यास्टिकच्या साह्याने अलगद काढून घ्यावा व मास्क काढताना त्याच्या समोरच्या भागाला स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • मास्क काढल्यानंतर तो तात्काळ बंद झाकणाच्या कचरा पेटीत टाकावा, परत वापरावयाचा असल्यास साबणाने स्वच्छ धुवून सुकवावा.
  • मास्क काढल्यानंतर आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत (किमान 20 सेकंदपर्यंत )

देशभरात मास्क सक्तीचा करणारा कायदा लागू करण्यात यावा 

मास्कच्या वापरा संबंधी देशाच्या वेगवेगळ्या भागात आणि महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मास्कची सक्ती आहे तर काही ठिकाणी त्यामध्ये सूट देण्यात आली आहे. काही जिह्यात मास्क न वापरल्यास कमी दंड आकारण्यात येतो तर काही ठिकाणी अधिक. तसेच मास्क संबंधित शासकीय आदेशाचे काटेकोर पालन कुठेही होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून संपूर्ण देशभरात मास्क सक्तीचा करणारा कायदा लागू करण्यात यावा व मास्क संबंधित संपूर्ण देशात एकच नियम लागू करण्यात यावा.

आयुष विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे

मास्क वापरण्या बरोबरच, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे पालन करणे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करणे, वेळोवेळी साबण किंवा सॅनिटाइझरने हात स्वछ करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे या सर्व उपाययोजना केल्यास आपण कोरोना विरुद्धच्या लढ्यात नक्कीच यशस्वी होऊ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com