मुलींवर कुठलेही बंधन न लादता तिला हवे ते क्षेत्र निवडू द्यावे - न्यायाधीश श्रीराम जगताप 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 28 January 2021

बालिका दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न

नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व हरिकिशनजी बजाज मेमोरियल शिक्षण विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप उपस्थित होते.

मुलगा व मुलीमध्ये भेद न करता मुलीला मुलासारखीच वागणूक देवून तिच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन न लादता तिला हवे असलेले क्षेत्र निवडू दिले पाहिजे अशी अपेक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी व्यक्त केली. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी लहानपणापासूनच समान संधी देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश राजेंद्र रोटे, सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर अदिती नागोरी, मनिषा कुलकर्णी, परभणी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य उर्मिला धूत- बिरला, अध्यक्ष हरिकिशनजी बजाज मेमोरियल माहेश्वर शिक्षण विकास संस्था नांदेड, गोपाललाल लोया, ह. ब. मे. माहेश्वरी शिक्षण विकास संस्थेचे सचिव प्रा. किशन दरक यांच्यासह यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे रिटेनर लॉयर, अॅड. नय्युमखान पठाण, अॅड. सुभाष बेंडे व कर्मचारी उपस्थित होते. महिलांनी संकटकाळात अडचणीतून मार्ग कसा काढावा याविषयी प्राचार्य उर्मिला धूत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर अदिती नागोरी व मनिषा कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let the girls choose the area they want without imposing any restrictions on them Judge Shriram Jagtap nanded news