esakal | शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यास सरकारला भाग पाडू : देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यास सरकारला भाग पाडू : फडणवीस

sakal_logo
By
धोंडीबा बोरगावे

फुलवळ (जि. नांदेड) : अतिवृष्टी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असतांना आज फुलवळ येथे त्यांनी थेट बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेती व शेती पिकांची पाहणी केली आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत असून सरसकट मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू असा दिलासा उपस्थितांना दिला.

अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दोन दिवस नांदेड दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस , प्रवीण दरेकर यांच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , लातूर चे खासदार सुधाकर शृंगारे , आमदार डॉ. तुषार राठोड , जि. प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर , जि. प.सदस्या प्राणिताताई चिखलीकर-देवरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: आर्यन खानला एनसीबीकडून अटक, कोर्टात हजर करणार

यंदाच्या खरीप हंगामात एकानंतर एक अशा संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपामुळे तीन वेळा अतिवृष्टी झाली आणि शेती पिके होत्याचे नव्हते झाली. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्ती ने हिरावला असल्याने शेतकरी राजा पुन्हा एकदा महासंकटात सापडला आहे. फुलवळ येथे आज पाहणी दौरा आला असता येथील शेती पिकांची पाहणी करत असतांनाच येथील शेतकऱ्यांनी या सर्व लोकप्रतिनिधी समोर आपल्या व्यथा मांडताना अक्षरशः आपल्या भावना अनावर झाल्याने ढसाढसा रडत आपलं दुःख व्यक्त केलं आणि व्यथा मांडत साहेब तुमचं सरकार असतांना आम्हा शेतकऱ्यांना वाली होता पण हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा वालीच हरवला असून शेतकरी उघड्यावर पडला आहे.

तुम्ही मुख्यमंत्री असतांना आम्हाला दरवर्षी पीकविमा , नुकसान भरपाई मिळाली परंतु हे सरकार आल्यापासून ना पीकविमा मिळाला नाही, वरून ७२ तासात ऑनलाईन तक्रार करा असा फतवा काढून पुन्हा शेतकऱ्यांना अडचणीत आणले . त्यामुळे आम्हाला कोणी मायबाप आहे का नाही असाच प्रश्न पडला असून आज आपण आल्याने आता आमचा जीव भांड्यात पडला असून आमची हाक या झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकार पर्यंत पोहचवताल यात शंकाच नसल्याचे ही शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.

यावेळी फुलवळ सह मुंडेवाडी , वाखरड , वाखरडवाडी , कंधारेवाडी , पानशेवडी , रहाटी आदी गावातील शेतकरी व ग्रामपंचायत च्या वतीने विविध निवेदने देत ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी व हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी आशा मागण्याही केल्या.

loading image
go to top