ओड समाजाच्या मागण्या विधिमंडळात मांडू :आमदार हंबर्डे | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओड समाजाच्या मागण्या विधिमंडळात मांडू : आमदार हंबर्डे
ओड समाजाच्या मागण्या विधिमंडळात मांडू आमदार मोहन अण्णा हंबर्डे

ओड समाजाच्या मागण्या विधिमंडळात मांडू : आमदार हंबर्डे

लोहा : महाराष्ट्र राज्यामध्ये दीड लाखाहून अधिक ओड समाज आहे. त्यांच्या न्याय मागण्यासाठी आपण विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडू. असे आश्वासन आमदार मोहन हंबर्डे यांनी दिले. ओड समाज मंडळ राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याच्या प्रसंगी आमदार हंबर्डे बोलत होते. लोहा शहरातील विकी गार्डन येथे राज्यव्यापी वार्षिक मेळावा गुरुवारी (ता.१८) आयोजित करण्यात आला होता.

या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी एकनाथ मोरे, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, लोहा पालिकेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटेश संगेवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार, काँग्रेसचे श्रीनिवास मोरे, गटनेते पंचशील कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे योगेश पाटील नंदनवनकर, सहायक पोलिस निरीक्षक रेखा काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओड समाज प्रदेशाध्यक्ष जी.एस. गवंडी यांनी केले. प्रदेश सचिव एन. एम. नलावडे, बीके गोंदवड, उत्तम कटवड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: नागपूर : एसटी संपामुळे ४० टक्के व्यवसाय बुडाला

आमदार हंबर्डे बोलताना म्हणाले, ओड समाज मुळातच शिक्षणापासून कोसो दूर राहिला आहे. अकुशल बांधकाम कामगार म्हणून त्यांची ओळख असली तरी आजही हा समाज शिक्षण वंचित आहे. ‘माताडी’ अशी जातीची नोंद आहे. सबंध महाराष्ट्रभर विखुरलेला हा समाज जात वैधता प्रमाणपत्रासाठी अडचणीत सापडला आहे. ओड बांधवासाठी आपण विधिमंडळात प्रश्न मांडणार आहोत. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ मोरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर या समाज बांधवांनी केल्या पाहिजेत. आजही या समाजात बालविवाह आणि शिक्षणाचे घटलेले प्रमाण ही भयावह स्थिती आहे. समाजातील नेत्यांनी पुढे येऊन शिक्षण आणि कुशल कामगार नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळ लवकरच जाणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू गायकर आणि वैजनाथ पांचाळ यांनी केले. शाहिर पळशीकर यांनी सुगम गायन केले.

loading image
go to top