
जिथे गर्दी तिथे राजकारणातील दर्दी
अर्धापूर : विविध पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना सतत जनसंपर्क ठेवावा लागतो. त्यामुळे जिथे गर्दी तिथे राजकारणातील दर्दी हमखास पाहायला मिळतात. सध्या तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. तेंव्हा जनसंपर्क वाढविणे आलेच. विवाह सारखं जनसंपर्काचे दुसरे कोणते माध्यम असू शकते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका घोषित होतील तेव्हा होतील पण भावी उमेदवारांची लगीन घाई सुरू झाली आहे. आपल्या गटातील व गणातील विवाह, धार्मिक सोहळे, अंत्यविधी आदी सोहळ्यात उपस्थिती लावताना भावी उमेदवारांची मात्र पूर्ती दमछाक होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपला असुन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण रद्द झाल्याने या घटकातील स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये खूप मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. आघाडी सरकारने विना ओबीसी आरक्षण निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण निवडणूक केव्हा ही लागू शकते, असे गृहीत धरून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपला जनसंपर्क वाढविणे सुरु केले आहे.
अर्धापूर तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण आहेत. यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समितीचे गण वाढणार असल्याची चर्चा आहे. भावी उमेदवारांची यादी खूप मोठी आहे. आपली उमेदवारी निश्चित आहे, लक्ष राहु द्या, वातावरण कसे आहे? असे म्हणत अनेकजण जनसंपर्क वाढवीत आहेत.
सध्या लगीनसराई जोमात असल्याने प्रत्येक गावात प्रत्येक मुहुर्तावर तीन ते चार लग्न सोहळे होत आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम, साखरपुडा आदी सोहळे होत आहे. या सोहळ्यांना गर्दी होणार हे हेरुन आपल्या समर्थकांना, पदाधिकाऱ्यांना खुष करण्यासाठी एकाच दिवशी आठ ते दहा सोहळ्यांना भावी उमेदवार दमछाक करत उपस्थिती लावत आहेत. मतदार कोणाच्या डोक्यावर मतदानाच्या अक्षदा टाकतील, हे काळच ठरवेल.
Web Title: Local Body Elections Public Relations Zilla Parishad And Panchayat Samiti Elections Ardhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..