माहूरच्या रेणुका मंदीर विश्वस्तात व पुजेसाठी महिलांना स्थान द्यावे- तृप्ती देसाई 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

यासाठी विश्वस्तात व पुजाऱ्यांमध्ये पन्नास टक्के महिला घेण्यात याव्यात अशी मागणी विश्वस्तांकडे करण्यात आली आहे.

नांदेड : माहूरचे रेणुका मंदीर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले जागृत देवस्थान आहे. मात्र या मंदीराच्या विश्वस्तात आणि पुजाऱ्यांमध्ये एकही महिला नाही. मातेला अंघोळ, कपडे, मंगळसुत्र हे पुरुष पुजारीच करतात हा तमाम महिला वर्गाचा अपमान आहे. यासाठी विश्वस्तात व पुजाऱ्यांमध्ये पन्नास टक्के महिला घेण्यात याव्यात अशी मागणी विश्वस्तांकडे करण्यात आली आहे. यासाठी लवकरच आंदोलन उभे करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तृप्ती देसाई ह्या मागील दोन दिवसापासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्या असताना त्या बुधवारी (ता. २७) दुपारी एका खासगी हाॅटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्यात महिलांवर सतत अन्याय, अत्याचार होत आहेत. महिलांना कमी दर्जाची वागणुक दिली जात असून ही पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकतीा बदलण्यासाठी आम्ही मागील काही वर्षापासून आंदोलन करत आहोत. राज्याच्या अनेक भागात गरीब कुटुंबातील मुलींचे हुंड्यापायी वेळेत लग्न  होत नाहीत. तर अनेक संसांर हे लग्नानंतर काडीमोड होतात. सरकारने या बाबीकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. 

हेही वाचानांदेड : पालकमंत्र्याच्या मतदार संघात दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीला मोठे भगदाड

महिला सबलीकरण, बेटी बचाओ- बेटी पढाओ ही घोषणा सरकारची फक्त कागदावर आहे. आता यापुढे जाऊन मुलींना शिक्षणासोबतच संरक्षण देण्याचा गरज आहे. राज्यात महिलां व मुलींवर बलात्कार, विनयभंग, अत्याचारानंतर खून अशा घटना वाढत आहेत. हे महाराष्ट्रासारख्या राज्याला अशोभनिय आहे. नांदेड जिल्ह्यात रामतीर्थ, बिलोली आणि भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमुळे संबंध राज्य ढवळून निघाले. बेटी पढाव- बेटी बचाव या धोरणाला हरताळ फासत नराधमांनी या बालिकांचे लचके तोडले. आता बेटी बचाव- बेटी पढाव सोबतच बेटी संरक्षण यासाठी भुमाता ब्रिगेड प्रयत्न करणार आहे.

माहूरच्या रेणुकामाता मंदिर ट्रस्टीवर ५० टक्के आणि आणि पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिलांचा समावेश करावा. यासाठी लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रि- पुरुष समानतेची भाषा करणाऱ्या सरकारने अशा घटना घडु नये यासाठी ठोस पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भूमाता ब्रिगेड व युवराज ढमाले काॅर्प यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजु मुलींच्या लग्नासाठी आर्थीक मदत करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी या मोहिमेची सुरवात सहा मुलींच्या लग्नासाठी धनादेश देऊन नांदेडमधून सुरवात केली. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी, पंढरीनाथ बोकारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahur's Renuka temple should be trusted and women should be given a place for worship Trupti Desai nanded news