युपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा टक्का घसरला हे आहे मुख्य कारण

शिवचरण वावळे
Wednesday, 5 August 2020

मंगळवारी (ता.चार) रोजी युपीएससीचा निकाल जाहीर झाला. यात मराठवाड्यातून १५ तर नांदेड जिल्ह्यातील केवळ तीन विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यावर त्यांना समाधान मानावे लागणार आहे. 

नांदेड ः मागील काही वर्षापासून पुणे शहरापाठोपाठ मेडीकल आणि स्पर्धा परीक्षेचे केंद्र म्हणून नांदेड जिल्ह्याने नावलौकीक मिळवले आहे. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातून अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होतात. यंदा मात्र मागील पाच महिण्यापासून लॉकडाउन सुरु असल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या निकालावर देखील चांगलाच परिणाम झाला आहे. 

जिल्ह्यात नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशस्त असे शासकीय जिल्हा ग्रांथालय आहे. जिथे तिनशे मुले एकत्र बसून अभ्यास करु शकतात. याशिवाय आंबेडकरवादी मिशनद्वारे ३०० विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबातील मुले स्पर्धा परिक्षेची मन लावून तयारी करतात. परिणामी दरवर्षी नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवतात. यंदा कोरोना महामारी आल्याने देशभरात लॉकडाउन करण्यात आले. 

हेही वाचा- Video - ॲन्टीजेन तपासणीस नांदेडमध्ये प्रतिसाद ​

आॅनलाईन शिक्षणावर मर्यादा

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने व खासगी शिकवणी वर्गाद्वारे ऑनलाइन अभ्यास पद्धतीवर भर दिला गेला. खरा परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट सारख्या सुविधांचा अभाव असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर मर्यादा आल्याने युपीएससी सारख्या परीक्षेच्या निकालात नांदेड जिल्ह्याची तिन पट घसरण झाल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना मत व्यक्त केले आहे. 

हेही वाचा- कुख्यात विक्की चव्हाण याच्यावर होते ‘एवढे’ गुन्हे,वाचा सविस्तर ​

नांदेड  जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची बाजी

मराठवाड्यातील १५ विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत चमक दाखवली. त्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील सुनिल शिंदे, बिलोली येथील आकाश आगळे, नायगाव येथील योगेश बावणे या तीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे तिन्ही विद्यार्थी शेतकरी कुटुंबातीलच आहेत. 

यंदा युपीएससीच्या निकालात तीन पटीने घसरण
एससी, एसटी प्रवर्गातील मुलांची शेवटची इंट्री असते. याच दरम्यान लॉकडाउन झाल्याने मुलांना ज्या पद्धतीने प्रशिक्षण देण्याची अवश्यकता होती. ती पूर्ण झाली नाही, ही वस्तूस्थिती आहे. आंबेडकरवादी मिशनद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु होता. परंतू, बहुसंख्य विद्यार्थ्यी सामान्य कुटुंबातील असल्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमावर मर्यादा आल्याने युपीएससीच्या निकालात तीन पटीने घसरण झाली. 
दिपक कदम, संचालक आंबेडकरवादी मिशन केंद्र, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Is The Main Reason Why Nanded District's Percentage In UPSC Exams Has Dropped Nanded News