विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको आंदोलन

अमोल जोगदंड 
Thursday, 15 October 2020

संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ मालेगाव (ता.अर्धापूर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मालेगाव (नांदेड) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ मालेगाव (ता.अर्धापूर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
 
गुरुवार (ता. १५) ऑक्टोंबर रोजी सकाळी आकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर संभाजी ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटवून मराठा समाजाला सरसगट ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावे, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज देण्यात यावे, कर्जमाफी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकर माफीचा लाभ देण्यात येऊन त्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे, यावर्षीचा सरसगट पिक विमा मंजूर करण्यात यावा, हाथरस अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, शेतातील डी.पी व गावातील सिंगल फेज डी.पी चालू करण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना देण्यात आले.  संभाजी ब्रिगेडच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, दशरथ कदम जिल्हा प्रवक्ता, शाहानंद मुधळ, अर्जुन मूधळ, दिनेश कदम, चंद्रकांत कल्याणकर, सखाराम मुधळ, दत्ता कदम, ज्ञानदेव कदम, व्यंकटराव कदम, विठ्ठल भिसे, आवदूत कदम, संतोष कदम, लक्ष्मण कदम, संतोष नवले, संदिप नवले, दीपक वानखेडे, आकाश नवले, पवन नवले, गणेश नवले वामन, गणेश आढाव, व्यंकटराव कराळे, सुदामराव चौरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसाही महावितरण कार्यालय बंद

यावेळी महावितरण कार्यालय मालेगाव येथे निवेदन देण्यास गेले असता दिवसाही महावितरण कार्यालय बंद होते. एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. गेल्या काही दिवसापासून मालेगाव परिसरातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे. महावितरणने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- भगवानराव कदम, जिल्हा अध्यक्ष- संभाजी ब्रिगेड, नांदेड

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Malegaon a Rasta Rocco agitation was organized for various demands of the Sambhaji Brigade