esakal | कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच व्यवस्थापन गरजेचे
sakal

बोलून बातमी शोधा

कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच व्यवस्थापन गरजेचे

कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच व्यवस्थापन गरजेचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी आदींचा समावेश आहे. पैकी कपाशीचे सर्वाधीक नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. संजोग बोकन यांनी केले आहे.

ते म्हणाले की, मुख्यतः बोंड सडण्याचे दोन प्रकार असतात. बाह्य बोंडसडमध्ये काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला कारणीभूत जिवाणू यांचा समावेश असतो. ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता बोंड सडण्याला पोषक असतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशीची वाढ झाल्याचेही दिसून येते.

आंतरिक बोंड सड ही समस्या पावसाळ्यात होणारा संततधार पाऊस, ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व बोंडावरील रस शोषणारे ढेकूण यांच्या प्रादुर्भावामुळे उद्भवते. अशी बोंडे फोडून बघितलीतर जीवाणूंच्या प्रादुर्भावाने आतील रुई पिवळसर ते गुलाबी-तपकिरी रंगाची दिसून येते. बोंडावरील पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो, अशा ठिकाणी जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते.

अशी करा उपाययोजना

बोंडांना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. आंतरिक बोंड सडण्याच्या विकृती व्यवस्थापनासाठी पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत काॅपर आॅक्सीक्लोराइड (५० टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन दोन ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (५० टक्के डब्लूपी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

loading image
go to top