नांदेडची भूमीकन्या मनाली सुधळकरचे औरंगाबादेत अरंगेत्रम नृत्याविष्कार

प्रल्हाद कांबळे
Thursday, 21 January 2021

नृत्याविष्काराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात व्ही सौम्याश्री यांची शिष्या व नांदेडची भूमीकन्या असलेल्या मनाली सुधळकर हिचा ता. 23 जानेवारी रोजी औरंगाबादच्या तापडिया रंगमंदिरात सादरीकरण होत आहे

नांदेड : अरंगेत्रम म्हणजे सात वर्ष गुरु सानिध्यात राहून भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध नृत्याविष्काराच्या प्रशिक्षणाचे सार्वजनिक सादरीकरण .... गुरू आणि शिष्याच्या मेहनतीची फलश्रुती. नृत्याविष्काराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात व्ही सौम्याश्री यांची शिष्या व नांदेडची भूमीकन्या असलेल्या मनाली सुधळकर हिचा ता. 23 जानेवारी रोजी औरंगाबादच्या तापडिया रंगमंदिरात सादरीकरण होत आहे. शून्यातून आलेले व सध्या उपजिल्हाधिकारी असलेले महेश सुधळकर यांची कन्या व अशोकराव देशमुख कौठेकर यांची नात असलेली मनाली आपला कलाविष्कार सादर करणार आहे. 

नांदेडकरासाठी ही बाब निश्चितच भूषनावह असून कोरोनाच्या लॉकडाऊननंतर अशा प्रकारचा महाराष्ट्र पातळीवरील शास्त्रीय नृत्याविष्काराचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. देशपातळीवर आपल्या कलेचा ठसा उमटवणाऱ्या मनालीने शास्त्रीय नृत्याविष्कारला वाहून घेतले आहे. शालेय अभ्यासाबरोबरच शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवणाऱ्या मनालीने आवड जोपासली आणि यावरच लक्ष केंद्रित करुन पुढील आयुष्य याच सर्वश्रेष्ठ कलेला समर्पित करण्याचे ध्येय निश्चित केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधताना यातच आपण करिअर करणार असल्याची भावना व्यक्त केली. मनाली सुधळकर ही देवमुद्रा कला अकादमीची विद्यार्थ्यांनी असून नृत्यशैलीमध्ये किमान सात वर्ष गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर नृत्यशैलीचे सर्वांसमक्ष सादरीकरणाला अरंगेत्रम म्हटले जाते. हे नृत्य सादर करणे हे शिष्य आणि गुरुंच्या दृष्टीने आनंदाचा अत्युच्च क्षण असतो. आनंद, अभिमान आणि समाधानाचा हा त्रिवेणी संगम साधणारा हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याची भावना मनाली ने व्यक्त केली.

२०१४ पासून व्ही सौम्याश्री पवार आणि राजलक्ष्मी सेठ यांच्याकडे भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेताना आई शर्मिला सुधळकर यांचे प्रोत्साहन महत्वाचे ठरेल्याचे सांगून महसूल विभागात प्रशासकीय अधिकारी असणारे वडील वेळ देऊ शकत नव्हते. मात्र जे करशील ते मन लावून कर, मेहनत आणि साधनेत सातत्य ठेव यशस्वी होणार हा आत्मविश्वास वडीलांनी दिला ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी होती. त्यांचा विश्वास मूर्त स्वरुपात आणण्याचा प्रयत्न म्हणजे हे अरंगेत्रम आहे अशा उत्कट भावना ही मनालीने व्यक्त केली. अत्यंत प्राचीन व सर्वश्रेष्ठ कला प्रकार म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या   भरतनाट्यमचा प्रसार आणि प्रचाराचे काम भविषयत करणार असल्याची भावना मनाली ने व्यक्त केली.  

तापडीया रंगमंदिरात ता. २३ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबईच्या नालंदा नृत्य नाट्य महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि प्रसिध्द नृत्यांगणा डॉ. उमा रेले यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य आणि नाट्य विभागाचे प्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, खासदार बी. बी. पाटील, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार ईश्वरराव भोसीकर देवमुद्रा कला अकादमीचे प्रमुख आणि भरतनाट्यमच्या गुरु व्ही. सौम्याश्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नांदेडच्या लेकीच्या या अरंगेत्रम कार्यक्रमाला नांदेडकरांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन सुधळकर व देशमुख कौठेकर परिवाराने केले आहे. 

प्रथमच ऑनलाईन प्रसारण 
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नृत्यप्रेमींना अरंगेत्रम मध्ये सहभागी होता यावे यासाठी या कार्यक्रमाचे युटूबवर थेट प्रसारण करण्यात येत आहे. मराठवाड्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच थेट प्रसारण होणार असून नृत्यप्रेमींनी https://www.youtube.com/user/devmudra2007या लिंकवर जाऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे मनाली च्या आई शर्मिला सुधळकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manang Sudhalkar, the daughter of Nanded, discovers Arangetram dance in Aurangabad nanded news