esakal | मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

महाराष्ट्र सरकार कुठे तरी कमी पडत असून मराठा समाजाला सर्व समाजाप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे असे मत एल्गार मेळाव्याचे प्रमुख छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (ता.आठ) नांदेड येथील मेळाव्यात मांडले. 

मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

sakal_logo
By
श्याम जाधव

नांदेड - मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा लढा सातत्याने चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १३ टक्के शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचे धोरण स्विकारले. मात्र, काहींनी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यासंदर्भात कायदेशीर लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र सरकार कुठे तरी कमी पडत असून मराठा समाजाला सर्व समाजाप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे असे मत एल्गार मेळाव्याचे प्रमुख छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (ता.आठ) नांदेड येथील मेळाव्यात मांडले. 

अध्यक्षस्थानी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधव पाटील देवसरकर, सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक सुभाष जावळे, रमेश पाटील केरे, डॉ. संजय लाखे पाटील, छावाचे प्रदेश संघटक आप्पासाहेब कुडेकर, प्रदेशाध्यक्ष पंजाब काळे पाटील, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव, मराठा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मनीष वडजे, प्रा.डॉ. गणेश शिंदे, छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष तानाजी हुस्सेकर, प्रा. डॉ. रेणुका मोरे, डॉ. गजानन माने, भास्कर हंबर्डे आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा- नांदेड : सोनखेड खूनप्रकरणातील मारेकरी मोकाट 

सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू मांडावी

खासदार संभाजी राजे म्हणाले, मराठा समाजाचा सेवक म्हणून सरकारला आवाहन करतो की, महाराष्ट्रातील मराठा समाज हा सर्वात मोठा समाज आहे. या मराठा समाजाला सर्व समाजाप्रमाणे आरक्षण देवून न्याय मिळाला पाहिजे. यासाठी न्यायालयीन लढाईसाठी सरकारने अभ्यासू वकिलांची नियुक्ती करावी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सखोल माहिती असणाऱ्या विद्वानांची समिती बनवून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू मांडावी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी २००७ पासून माझा लढा सुरू आहे. बहुजन समाज हा एका छताखाली, एकत्र यावा, गुण्यागोविंदाने नांदावा, अशी माझी भूमिका आहे. बहूजन समाजाला एकत्र आणायचे असेल, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. यशस्वितेसाठी डॉ.बालाजी पेनूरकर, विलास इंगळे, मंगेश कदम, प्रशांत मुळे, विजय कदम, सुनिल कदम, गणेश काळम, शिवाजी जाधव, नवनाथ जोगदंड आदींनी परिश्रम घेतले. या वेळी महिला आघाडीच्या सुनिता देवसरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.शिल्पा शेंडगे, मनोरमा चव्हाण यांचीही उपस्थिती होती. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : महामार्ग पोलिस भलत्याच कामात व्यस्त, रस्त्यावरील खड्ड्यांच्या लागले मागे

अशोत चव्हाणांनी योग्य तयारी करावी 

अशोक चव्हाणांनी समाजातील योग्य त्या विद्वान लोकांची एक समिती बनवावी. त्यांच्या अभ्यासाचा लाभ, न्यायालयात बाजू मांडताना वकिलांना होऊ शकेल. अधिकारी आणि सरकारने एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. ती उणीव मागच्या काळात न्यायालयात बाजू मांडताना दिसत राहिली. त्याचा मोठा फटकाही बसला. परंतू, यापुढे त्या चुका टाळत योग्य त्या पद्धतीने तयारी करून, कोर्टात समाजाची बाजू मांडली पाहिजे, असेही ते म्हणाले. 
-संपादन- शिवचरण वावळे

loading image
go to top