esakal | Nanded : विष्णुपुरीच्या पाच दरवाजातून विसर्ग सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded : विष्णुपुरीच्या पाच दरवाजातून विसर्ग सुरूच

Nanded : विष्णुपुरीच्या पाच दरवाजातून विसर्ग सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या दोन दिवसापासून विष्णुपुरी प्रकल्पाचे जवळपास दहा ते पंधरा दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग चालू होता. दरम्यान, शुक्रवारी (ता. एक) रात्री नऊ वाजता पाच दरवाजे उघडे असून त्यातून एक हजार ५८५ क्युमेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. दोन दिवस उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. एक) दुपारी काही वेळ शहर आणि इतर भागात हजेरी लावली.

मराठवाड्यात सर्वत्र पाऊस झाल्याने गोदावरी नदीसह इतरही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूस असलेल्या जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव, दिग्रस त्याचबरोबर येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे भरलेली असल्यामुळे त्यातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग हा पुढे गोदावरी नदीत येऊन मिळतो. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे गेल्या दोन दिवसांपासून जवळपास १५ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला.

शुक्रवारी (ता. एक) हळूहळू पाण्याचा येवा कमी होत गेल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत प्रकल्पाचे पाच दरवाजे सद्यस्थितीत सुरू ठेवण्यात आले आहेत. सध्या प्रकल्पाची पाणी पातळी ३५२.८५ मीटर असून पाण्याची टक्केवारी ६२.१० टक्के आहे. गोदावरी नदीच्या पात्रात सध्या दोन हजार २४० क्युमेक्स विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हजेरी लावली. नांदेड शहर आणि सिडको, हडको आदी परिसरात हा पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला. त्याचबरोबर दुपारनंतर हवामान ढगाळ झाले होते. नदीकाठच्या नावघाट, नगीना घाट, राम घाट, बंदा घाट, गोवर्धन घाट आदी भागातील काही नगरात पाणी शिरले होते. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन गेल्या चार पाच दिवसांपासून नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने १७ तात्पुरत्या निवारा केंद्राची सुरूवात केली होती. त्या ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नदीकाठी स्वच्छता मोहीम सुरू

गोदावरी नदीचा पूराचा जोर कमी झाल्यानंतर घाटावर आणि त्या भागातील नगरांमध्ये रोगराई पसरू नये, यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. गेल्या आठवड्यात देखील महापालिकेने स्वच्छता मोहिम आणि औषध फवारणी केली होती. आता पुन्हा पूर ओसरल्यानंतर स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे तसेच निवारा केंद्रातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top