esakal | दुर्दैवी घटना : मेहंदी सुकण्यापूर्वीच विवाहितेचा मृत्यू; लग्नानंतरची नववी रात्र ठरली काळरात्र

बोलून बातमी शोधा

file photo}

हा नियतीचा खेळ नुकत्याच सासुरवाशीण झालेल्या मरतोळी येथील श्रेया बेळीकर हिच्या नशिबी आला.

nanded
दुर्दैवी घटना : मेहंदी सुकण्यापूर्वीच विवाहितेचा मृत्यू; लग्नानंतरची नववी रात्र ठरली काळरात्र
sakal_logo
By
सद्दाम दावणगीरकर

मरखेल (जिल्हा नांदेड) : सात जन्माच्या फेऱ्या पूर्ण करून नवविवाहितेने सुरू केलेला नवा संसार नियतीला मान्य नव्हता. आपल्या जोडीदारासह नवीन पर्वाचा आरंभ करण्याच्या आणाभाका घेऊन आपल्या माहेरला सोडून सासुरवाशीण झालेल्या १९ वर्षीय नवविवाहितेवर काळाची झडप पडली. विवाहाच्या नवव्या दिवशीची रात्र ही काळरात्र ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा नियतीचा खेळ नुकत्याच सासुरवाशीण झालेल्या मरतोळी येथील श्रेया बेळीकर हिच्या नशिबी आला.

सात जन्माच्या सप्तफेऱ्या पूर्ण करून नव्या जीवनाची सुरुवात करण्याआधीच नियतीला मान्य नसलेल्या काळाने या स्वप्नाची राख रांगोळी झाली. येथून जवळच असलेल्या मरतोळी (ता. देगलूर)  येथील पत्रकार दादाराव बेळीकर यांची कन्या श्रेया दादाराव बेळीकर (वय १९) या नववधूचे कर्नाटकातील सिद्धेश्वर विठ्ठलराव मडिवाळ (रा. सुंदाळ ता. औराद जि. बिदर) यांच्यासोबत रविवारी (ता. २१) रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र हातावरच्या मेहंदीची लाली गडद असतानाच या विवाह सोहळ्याच्या नवव्या दिवशी सासरी सुंदाळ येथे सोमवारी (ता. एक) रोजी पहाटेच्या सुमारास दोन वाजता झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने श्रेयाचा मृत्यू झाला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे माहेर व सासर अशा दोन्ही ठिकाणच्या गावात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नऊ दिवसांपूर्वीच मरतोळीच्या ग्रामस्थांनी श्रेयाला आनंद अश्रूंनी नव्या संसाराला शुभेच्छा देऊन पाठवणी केली होती. परंतु अवघ्या नऊ दिवसात नववधूवर घडलेल्या या दुःखद घटनेने श्रेयाच्या परिवारासह गावकऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूंचा पाझर फुटला आहे. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या श्रेया हिच्यावर काळाने घातलेला हा घाला मरतोळीच्या ग्रामस्थांना विसरण्याइतका सोपा नाही. या दुर्दैवी व अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विवाहाच्या नवव्या दिवशीच या पवित्र संसाराचा मात्र अंत झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे