esakal | लग्नासाठी मंगल कार्यालये उघडली खरी पण...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना काही नियम व अटी शर्तीच्या अधिन राहून केवळ लग्नसमारंभाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे. 

लग्नासाठी मंगल कार्यालये उघडली खरी पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मंगल कार्यालयांचे दरवाजे उघडण्यात आले खरे पण लग्न सोहळ्यासाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. सात) घेतला असून लग्नाला उपस्थित ५० लोकांची यादी, त्यांचे पत्ते व मोबाईल क्रमांक प्रशासनाकडे द्यावे लागणार आहेत.

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदींवर गर्दी होत असल्यामुळे बंधने घालून बंद ठेवण्यात आले होते. तब्बल दोन महिन्यानंतर आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार आता मंगल कार्यालयांमध्ये लग्न सोहळ्यास नियम व अटींच्या शर्थी घालून परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा - सावधान...! मराठवाड्यात हुमनीचे भुंगे निघण्यास सुरवात -

काय आहेत आदेश?
नांदेड शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवेचा वापर सार्वजनिक लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार लग्न समारंभासाठी पन्नास व्यक्तींना नियम व अटीच्या अधीन राहून उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालयांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पण परवानगी फक्त ५० लोकांचीच देण्यात आली आहे. 

का घेतला निर्णय?
लग्न समारंभास पन्नास व्यक्तीपर्यंत दिलेल्या मर्यादेच्या अनुषंगाने लोकांकडे त्यांची स्वतःची किंवा नातेवाईकांकडील जागेत लग्न समारंभ पार पाडण्यात जागा उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच कमी जागेत लग्न समारंभ पार पाडण्यास त्या ठिकाण सामाजिक अंतर व कोरोनाच्या अनुषंगाने निच्शित केलेले नियम व अटींचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे उपाययोजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना काही नियम व अटी शर्तीच्या अधिन राहून केवळ लग्नसमारंभाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे. 

काय आहेत अटी व शर्थी...
एका वेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयातील कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ५० पेक्षा जास्त असू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅण्डवॉश आणि सॅनीटायझरचा वापर करणे तसेच थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुनच प्रवेश द्यावा. सदर ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क असणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्‍यक आहे. मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू व ठिकाणांचे नियमित निजंर्तुकीकरण करणे आवश्‍यक आहे. सदर लग्न समारंभा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत करणे तसेच लग्न समारंभाची पूर्ण प्रक्रिया पाच ते सहा तासाच्या आत संपविणे बंधनकारक असेल. या ठिकाणी सॅनिटायझरचा साठा असावा. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ५५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांना मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती माता व दहा वर्षाखालील मुलांना शक्यतोवर प्रवेश टाळावा. लग्नामध्ये येणाऱ्या लोकांची यादी शासनाकडे लग्नाच्या आधी सादर करावी तसेच लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते आवश्‍यक राहतील. मंगल कार्यालयाच्या आवारात थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. 

हेही वाचलेच पाहिजे - विद्यापीठाने तयार केली जिवाणू खते; जमिनीचा सुधारतो पोतही -

नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
मंगल कार्यालयात नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा मंगल कार्यालयांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर आदेशाचे पालन होते किंवा नाही, या बाबी तपासून आवश्‍यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिका हद्दीत महापालिका व पोलिस विभागाचे संयुक्त पथक, नगरपालिका हद्दीत नगरपालिका आणि पोलिस विभागाचे संयुक्त पथक तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलिस विभागाचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांची आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. 

loading image