संवर्धनासाठी प्रत्येकाने 'पर्यावरणवादी' व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mazi vasundara campaign

संवर्धनासाठी प्रत्येकाने 'पर्यावरणवादी' व्हावे

उदगीर : पर्यावरणातील पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेतले आहे. प्लॅस्टिकलाही बंदी घातली आहे. समाजातील सर्व घटकांनी योगदान दिले तरच पर्यावरण संतुलन घडून येईल. यासाठी प्रत्येकाने पर्यावरणवादी व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनात शनिवारी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘मराठी साहित्यात निसर्ग चित्रणच आहे, पर्यावरण नाही’ हा या परिसंवादाचा विषय होता. पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. किरण वाघमारे व डॉ. अनिता तिळवे यांनी परिसंवादात आपले विचार मांडले. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, "आता पर्यावरणवादी तज्ज्ञांनी सर्वांसमोर निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजेत. त्यातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ सुरू व्हावी. ऊर्जा धोरणानुसार २०२५ पर्यंत निम्म्या बस विजेवर चालण्याचा निर्धार केला आहे.

श्री. देऊळगावकर म्हणाले, ‘हवामान बदल आवाक्याबाहेर गेला आहे. जंगल नष्ट करण्याचे काम हातात हात घालून होत आहेत. शिक्षा होत नाही तोपर्यंत प्रदूषण कमी होणार नाही. हवामान बदलामुळे दरवर्षी वीस लाख लोकांचा हकनाक बळी जात आहे.

साहित्यातील निसर्ग चित्रणाचा प्रवास व इतिहास सांगून डॉ. पाटील म्हणाले, की साहित्यात तीन दशकांपासून पर्यावरणाच्या जाणिवा दिसून येत आहेत. साहित्यातील पर्यावरणीय जाणिवा पाहता पर्यावरण सध्या साहित्याच्या मध्यवर्ती ठिकाणी दिसून येते. डॉ. मोरे म्हणाले, की साहित्यात पर्यावरण चित्रणाच्या स्वरूपात दिसून येते. जाणिवाच्या रूपाने ते दिसल्यास ते प्रभावी ठरेल. परिसंवादातील सूचनांचा विचार करण्याची हमी राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली आहे. डॉ. वाघमारे यांनी मराठी साहित्यात निसर्गाला जोडून मांडलेल्या अध्यात्मात पर्यावरण दिसून येत असल्याचे सांगितले. निसर्ग आणि संस्कृतीचा विचार केला तर त्यात पर्यावरण संवर्धन आढळून येईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी केले. कृष्णा लवळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. लहू वाघमारे यांनी आभार मानले.

Web Title: Mazi Vasundara Campaign Everyone Environmentalist Conservation Sanjay Bansode

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top