मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा प्राथमिकतेने कोविड रुग्णालयांना करावा- सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

कोविड रूग्णालय व इतर आजारावर उपचार करणारे इतर रूग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची मागणी पाहता जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही यासाठी  अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने जिल्हयातील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादक, पुरवठादार, खाजगी कोविड रूग्णालयांचे प्रतिनिधी व इंडियन मेडिकल आसोसिएशनचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक नुकतीच घेतली.

नांदेड : मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करून प्राथमिकतेने त्याचा पुरवठा जिल्हयातील कोविड रूग्णालयांना करावा अशी सूचना पुरवठादारांनी मेडिकल ऑक्सिजचा पुरवठा कोविड रुग्णालयांना निर्धारीत किंमतीतच करावा अशी सुचना सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड यांनी दिल्या.

कोविड रूग्णालय व इतर आजारावर उपचार करणारे इतर रूग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची मागणी पाहता जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही यासाठी  अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने जिल्हयातील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादक, पुरवठादार, खाजगी कोविड रूग्णालयांचे प्रतिनिधी व इंडियन मेडिकल आसोसिएशनचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक नुकतीच घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा -  आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार

जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत व येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा

जिल्ह्यात कोविड- 19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ते पाऊल उचलत आहे. रुग्णांसाठी शासकिय जिल्हा रुग्णालय तथा खाजगी कोविड रूग्णालय कार्यरत आहेत. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याअनुषंगाने या बैठकीत जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत व येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा झाली. तसेच कोविड रुग्णालयांच्या प्रतिनिधींना मेडिकल ऑक्सिजनच्या वापरासंबंधी उपकरणांची जुळवणी, ऑक्सिजन फ्लो रेट, दाव व उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनसाठा व रिकामी झालेली नळकांडे तात्काळ पुर्नभरणीसाठी उत्पादकाकडे त्वरीत पाठवणे इत्यादी बाबत दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.

इंडियन मेडिकल आसोसिएशनच्या प्रतिनिधींना सुचना

इंडियन मेडिकल आसोसिएशनच्या प्रतिनिधींना जिल्हयातील इतर खाजगी रूग्णालयात गरजेपेक्षा जास्त मेडिकल ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा होणार नाही त्याबाबत त्यांच्या सभासदांना सुचित करावे. जिल्हा प्रशासन हे मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करतांना होणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता प्रयत्नशील आहे, असे सहायक आयुक्त (औषधे) रोहित गठोड व व औषध निरिक्षक मा. ज. निमसे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Oxygen should be supplied to Kovid Hospitals first Assistant Commissioner (Medicines) Rathore nanded news