मनसेचा काॅग्रेसला सवाल, नांदेड शहर खड्डेमुक्त कधी करणार? 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 5 January 2021

नांदेड शहर खड्डेमुक्तीसाठी काॅग्रेस प्रयत्न करणार का ? मनसे आक्रमक, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

नांदेड : नांदेड शहर खड्डेमुक्त कधी होणार याबाबतचे उत्तर काॅग्रेसच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिका प्रशासनाने द्यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. गुरुगोविंदसिंघ यांच्या पावन भूमीत सन २००८ च्या गुरुत्तागद्दीच्या योजनांतर्गत शहराच्या झालेल्या विकासानंतर आजतागायत महानगरपालिकेच्या रस्त्याचा प्रगती अहवाल हा गुत्तेदारधार्जिना झालेला आहे. त्यात जनतेला खड्ड्यांचा जो त्रास होत आहे हे नांदेडकर नागरिक रोजच पाहात आहेत.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड शहरात ये- जा करणाऱ्या प्रवाशी मनक्याच्या आजाराने त्रासले असून प्रवाशांचे बेहाल होत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील रस्ते खड्ड्येमय झाले असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहरातील नागरिकांना खड्ड्यांतून केव्हा मुक्त करणार तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा आलेला निधी इतरत्र वळविल्यास त्याचे परिणाम महापालिकेला भोगावे लागतील असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. सन २०१८- २०२० मधील दलित वस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार करुन निधी इतरत्र वळवून दलित जनतेची विकासाच्या नावावर थट्टा व फसवणूक करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर ऍट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करावेत, अन्यथा मनसे कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे, असेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचानांदेड : परिवर्तनाची सुरुवात पुरुषांनी स्वत: पासून करावी, अक्षय ढोके यांचे आवाहन -

जिल्हाध्यक्ष मॉंटीसिंघ जहागीरदार यांच्या आदेशानुसार मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफीक यांच्या नेतृत्वाखाली मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुभाष भंडारे, शक्तीसिंघ परमार, रवी राठोड, संतोष सुनेवाड, महेश ठाकूर, अनिकेत परदेशी, श्रीनिवास एडके आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS's question to Congress, when will Nanded city be pit-free? nanded news