जन्मदात्या आईने केला तीन वर्षाच्या मुलाचा खून 

प्रकाश जैन
Tuesday, 29 September 2020

पहिल्या लग्नाबाबत समाधानी नसल्याने पत्नीने पतीविरूद्ध पोटगीचा अर्ज न्यायालयात दाखल केला. त्याचबरोबर दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या लग्नात तीन वर्षाच्या मुलाची अडचण येत होती. त्यामुळे जन्मदात्या आईने तीन वर्षाच्या मुलाचा विष पाजून खून केल्याचा आरोप मुलाच्या आजोबाने केला असून हिमायतनगर पोलिस ठाण्यात आईसह पाच जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. 

हिमायतनगर - दुसरे लग्न करण्यासाठी तीन वर्षाचा मुलगा अडसर ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच तीन वर्षाच्या मुलाचा विष देऊन खून केल्याची घटना खडकी बाजार (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे उघडकीस आली आहे. याबाबत मुलाच्या आजोबाने दिलेल्या तक्रारीवरून आईसह माहेरच्या पाच जणांविरूद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बोरगाव (ता. हिमायतनगर) येथील शेतकरी अशोक भोजराव तवर देवसकर (वय ६०) यांचा मुलगा संदीप उर्फ संजय (वय ३०) हाही शेतकरी आहे. त्याचे लग्न कांताबाई (वय २८) सोबत झाले होते. पण त्याच्याशी तिचे पटत नव्हते. नवरा शेतकरी व दिसायला हाडकुळा असल्याने तिला तो आवडत नव्हता. दरम्यान, त्यांना ता. २८ मार्च २०१६ दरम्यान मुलगा झाला व त्याचे नाव नमन उर्फ शिवप्रसाद ठेवण्यात आले. मुलगा झाल्यानंतर भांडणे कमी होतील, असे वाटले होते. पण ती काही कमी झाली नाहीत. उलट वाढतच गेली. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

पोटगीचा केला होता अर्ज
सतत भांडणे होत असल्यामुळे काही दिवसानंतर कांताबाईने सासर सोडून माहेर गाठले आणि माहेरी खडकी बाजार येथे आई वडिलांसोबत राहून लागली. दरम्यान, तिने हिमायतनगर येथील न्यायालयात नवऱ्याविरूद्ध अर्ज दाखल करुन पोटगी मागितली. त्यावेळी वडिलांनी मुलगा नमन उर्फ शिवप्रसाद (वय तीन) याचा ताबा देण्याची विनंती केली पण तो लहान असल्याने त्याचा ताबा मिळाला नाही. 

पाच जणांनी केले संगनमत
कांताबाई हिला तिच्या मनासारखा दुसरा नवरा करायचा होता परंतु हा तीन वर्षाचा मुलगा लग्नासाठी अडचणीचे कारण होऊन बसला होता. कांताबाई ही माहेरी तिची आई सुनंदा सुर्यवंशी (वय ५०), वडील दत्ताराव सुर्यवंशी (वय ५५), आजोबा देवराव सुर्यवंशी (वय ७०) आणि ममता देवराव सुर्यंवशी (वय २१, चौघेही रा. खडकी) यांच्यासोबत राहत होती. त्यामुळे तिने या चौघांसोबत संगनमत केले. वाईट उद्देशाने त्या मुलाला ता. २३ सष्टेंबर रोजी विष दिले. त्यामुळे त्याला संडास व उलट्या झाल्या. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस 

उपचार सुरु असताना मृत्यू
नमन उर्फ शिवप्रसादला आई कांताबाई व तिच्या नातेवाईकांनी सुरवातील हिमायतनगर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यानंतर त्याला नांदेडला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा शनिवारी (ता. २६) मृत्यू झाला. त्यामुळे याबाबत त्याचे आजोबा अशोक तवर देवसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन पुढील तपास करत आहेत. 
(संपादन - अभय कुळकजाईकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother kills three-year-old boy, Nanded news