खा. हेमंत पाटील यांच्या पत्राने आरोग्य व महापालिका प्रशासनाला घाम, काय आहे पत्रात ?

प्रल्हाद कांबळे
Sunday, 13 September 2020

आरोग्य विभाग व महापालिका यांच्यात एकमेकात पायपोस नसल्याने अनेक गंभीर रुग्णांना ही लस मिळत नाही. अशा तक्रारी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पुरविण्यात आलेल्या इंजेक्शनचा हिशोब महापालिका आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे विचारला आहे. यामुळे यंत्रणेला चांगलाच घाम फुटला आहे. 

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरुन मोठा निधी खर्च कुन रुग्णांच्या आरोग्यासाठी सर्वसुविधा पुरविण्यात याव्या अशा सक्त सुचना आहेत. त्यासाठी सर्व यंत्रणा पुरविण्यात येत आहेत. त्यात कोरोनावर उपाय म्हणून रेमडेसिवर ही लस देण्यात आली. मात्र आरोग्य विभाग व महापालिका यांच्यात एकमेकात पायपोस नसल्याने अनेक गंभीर रुग्णांना ही लस मिळत नाही. अशा तक्रारी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पुरविण्यात आलेल्या इंजेक्शनचा हिशोब महापालिका आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे विचारला आहे. यामुळे यंत्रणेला चांगलाच घाम फुटला आहे. 

प्रशासनाकडून या इंजेक्शनच्या उपलब्धतेची सर्व माहिती मागवली आहे. कोरोना केअर सेंटरवर काम करणाऱ्या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक तसेच खासगी रुग्णालयातील उपचाराच्या पद्धतीची माहिती देण्याच्या पत्रामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. मागील काळात जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात किंवा बाहेरील जिल्ह्याच्या रुग्णायात धाव घेऊन उपचार करून घ्यावे लागले. खासदार हेमंत पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणेने इंजेक्शनचा पुरवठा मुबलक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा धक्कादायक ! वादग्रस्त सुदाम मुंडेने पुन्हा दवाखाना सुरु केला, चक्क दोन महिलांचे गर्भही केले गायब. -

८० टक्के व २० टक्के काय आहे फॉर्म्युला

खासदार पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात खाजगी रुग्णालयात शासकीय दराने उपचार घेणाऱ्या ८० टक्के आणि रुग्णालय व्यवस्थापनाच्या २० टक्के प्रमाणातील रुग्णांची माहिती मागवली आहे. महापालिकेच्या वतीने शहरात जी कोरोना केअर सेंटर उपलब्ध आहेत तेथील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे पद व मोबाईल क्रमांक याची माहिती मागविली आहे. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून शहरातील कोणकोणत्या खाजगी रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचाराची सवलत दिली. याबद्दल खासदार पाटील यांनी आयुक्तांकडे विचारणा केली आहे.

जागेअभावी रुग्णांचे हाल

जिल्ह्यात कोरोना वाढत चालला असून दररोज जितके नवीन रुग्ण पॉझिटिव्ह येतात त्या तुलनेत निम्म्याहून कमी रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. या रुग्णांना ठेवायचे कुठे असा प्रश्न प्रशासनासह खासगी रुग्णालयाच्या चालकांनाही पडला आहे. जागेअभावी रुग्णालयातील कोपऱ्यात किंवा नव्या सुविधा नसलेल्या जागेत रुग्णावर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. 

येथे क्लिक करानांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू

रेमडेसिवर इंजेक्शन ३२७ पैकी २९४ रुग्णांना दिले

गेल्या महिन्याभरापासून हे इंजेक्शनसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठपुरावा करीत असल्याने ता. ३१ जुलै ते ता. २७ ऑगस्ट या कालावधीत ३२७ इंजेक्शनचा पुरवठा झाला. यातील २९४ इंजेक्शन रुग्णांना देण्यात आले. हे सर्व इंजेक्शन जिल्हा रुग्णालय तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णांसाठी वापरण्यात आले. दररोज किमान २० याप्रमाणे इंजेक्शन आवश्यक असून पुढील दहा दिवसांच्या कालावधीसाठी मागणी केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळविले आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नव्या इमारतीत कोविड रुग्णावर उपचार सुरू करण्यात आला असून येथे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. येत्या मंगळवारपासून येथील आॅक्सिजन पुरवठा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mp Hemant Patil's letter to the health and municipal administration sweat, what is in the letter nanded news