esakal | पालकमंत्र्यासह प्रशासनावर राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा खासदारांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेडला नवीन शासकीय रुग्णालय तसेच सीटी स्कॅन विभागाचे उद्‍घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (ता. सात) झाले. मात्र, या कार्यक्रमास नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना डावलल्याने त्यांनी याबाबत पालकमंत्र्यासह प्रशासनावर राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. 

पालकमंत्र्यासह प्रशासनावर राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा खासदारांचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या दबावाला बळी पडून जिल्हा प्रशासनाने राजशिष्टाचाराचा भंग केला आहे. विरोधी पक्षाच्या खासदार व विधानपरिषद सदस्यांना डावलून दोनशे खाटांच्या नवीन रुग्णालयाचा व सीटी स्कॅन विभागाचा लोकार्पण सोहळा गुपचुपरित्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उरकरण्यात आला असून या कृतीचा भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निषेध केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत असताना राज्याचे बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना सुबुध्दी सुचेल असे वाटले होते परंतु तसे झाले नाही. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील शासकीय मालमत्ता स्वत:ची खासगी मालमत्ता असल्याच्या अर्विभावात ते सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून राजशिष्टाचार मोडीत काढण्याचा उद्योग सध्या जिल्ह्यात सुरु असल्याचा आरोपही खासदार चिखलीकर यांनी केला आहे. 

हेही वाचा - नांदेड @४९३ ; नऊ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, उपमहापौरही बाधीत
 

पोलिस ठाण्याच्या भूमीपूजनालाही निमंत्रण नाही
गेल्या आठवड्यात अर्धापूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमास नांदेडचा खासदार या नात्याने आपणाससह भाजपाच्या विधान परिषद सदस्यांला डावलण्यात आले. शासकीय रुग्णालयाच्या दोनशे खाटांच्या नवीन हॉस्पीटलचा लोकार्पण 
सोहळा गुपचुपरित्या उरकण्यात आला आहे. जिल्ह्याचा खासदार या नात्याने या सोहळ्याचे साधे निमंत्रण आपणास देण्यात आले नाही. नांदेडचा खासदार हा विरोधी पक्षाचा असला तरी राजशिष्टाचारानुसार शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आवश्यक असतानाही जिल्हा प्रशासनाने भाजपाचे खासदार, विधानपरिषदेचे सदस्यांना डावलून हा लोकार्पण सोहळा उरकून घेण्याच्या कृतीचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो असेही खासदार चिखलीकर म्हणाले.

पालकमंत्र्यांकडून सत्तेचा दुरुपयोग 
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण असल्यामुळे शासकीय मालमत्तेच्या इमारतीवर केवळ आपले एकट्याचेच नाव कोरले जावे, या हेतूने त्यांनी खासदाराला डावलून हा कार्यक्रम घेण्याचे फर्मान सोडले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन शासकीय मालमत्तेच्या दगडावर स्वत:चे नाव कोरले असले तरी नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या ‍हदयात माझे नाव कोरले असल्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने प्रचंड मतांनी खासदार म्हणून निवडून दिले आहे, याचे भान पालकमंत्र्यांनी ठेवायला पाहिजे, असा टोलाही खासदार चिखलीकर यांनी लगावला आहे.

हेही वाचलेच पाहिजे - कोरोनाचा सामना : नांदेडात आता मिशन ब्रेक द चेन 

जिल्हा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर 
संपूर्ण नांदेड जिल्हा स्वत:ची खासगी मालमत्ता असल्याच्या अर्विभावात अशोक चव्हाण राहू नये. लोकसभेत त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिल्यानंतरही त्यांना शहाणपणा आला नाही हे दुर्देव आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा खासदार, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर हे आहेत. राजशिष्टाचारानुसार या लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक असताना जिल्हा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करुन सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा निषेध खासदार चिखलीकर यांनी नोंदविला आहे.