esakal | श्री. गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या मनमानीला ज्येष्ठ नागरिक संतप्त
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

श्री. गुरु गोविंदसिंगजी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या मनमानीला ज्येष्ठ नागरिक संतप्त

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आधीच लस मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना (Covid vaccination) श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या स्वमर्जीप्रमाणे बदलणाऱ्या नियमाचा फटका बसला (senior citizon) असून अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभाराने ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. (Mr. Senior citizens angry over arbitrariness of doctors at Guru Gobind Singhji Hospital)

गेल्या अनेक दिवसापासून कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस मिळावा यासाठी 45 वर्षावरील नागरिक दररोज रुग्णालयाच्या चकरा मारत होते. रविवारपासून कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होणार असल्याची बातमी मोठा गाजावाजा करुन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्यामुळे शेकडो नागरिकांनी लसीकरण केंद्रावर रांगा लावल्या होत्या. भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या साठ दिवसापासून श्री गुरु गोविंद सिंगजी लसिकरण केंद्रात नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट देण्यात येत असल्यामुळे या केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती असते.

हेही वाचा - राजीव सातव यांना अखेरचा निरोप; मुलगा पुष्कराज याने दिला अग्नी, चाहत्यांचा शोक अनावर

रविवारी (ता. १६) सकाळी पाच वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिकांनी टोकन मिळेल या उद्देशाने श्री गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयासमोर रांगा लावल्या होत्या. नऊ वाजता टोकन वाटण्यात आले. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांचा रांगेत सातवा नंबर असताना त्याला 28 नंबरचे टोकन मिळाले. थोड्याच वेळात 100 टोकन संपल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे रांगेत उभे असलेल्या नागरीकांचा संयम सुटला. जेमतेम 50 टोकन वाटून 100 टोकन संपल्याचे दर्शवून वशिल्यांच्या लोकांना लस देण्यात येत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या तोंडावर केला. आजचे टोकण संपले उद्या परत सकाळी नऊ वाजता टोकन मिळतील अशी समजूत घातल्यामुळे नाईलाजाने पाच तास रांगेत थांबलेल्या नागरिकांनी रुग्णालय सोडले.

सोमवारी (ता. १७) शहरातील इतर लसीकरण केंद्रात टोकन वितरित होत असताना श्री गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयात मात्र आजचे टोकण कालच वाटण्यात आले असा बोर्ड लावण्यात आला होता. सुरक्षा रक्षक ज्येष्ठ नागरिकांना रांगेत थांबू देत नव्हते. त्यामुळे सकाळी उठून रांगेत थांबण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा झाली. मे महिन्यात श्री गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयाच्या उंटावरुन शेळ्या हाकणा-या डाॅक्टारांनी ज्येष्ठ नागरिकांना एप्रिल फूल केल्याची संतप्त भावना अनेकांनी व्यक्त केली. दररोज नियम बदलणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी लगाम लावावा तसेच मागच्या दारातून टोकन वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केंद्रात सीसीटीव्ही लावण्यात यावे अशी मागणी अनेकांनी केली आहे.