महावितरण : वीजचोरी करणाऱ्या 52 आकोडे बहाद्दरांवर कारवाई, कुठे त वाचा?

प्रल्हाद कांबळे
Monday, 14 September 2020

नांदेड जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने आज वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली.

नांदेड : वातावरणात उष्णतावाढल्यामुळे विजेचा वापर वाढला असून चोरून वीज वापरल्यामुळे रोहीत्र बंद पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे नांदेड जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने आज वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत लोहा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या तीन गावामधील आकोडा टाकून अनधीकृतपणे वीज वापरणाऱ्या 50 आणि हदगाव उपविभागातील 12 लोकांवरती वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या निर्देशानुसार लोहा उपविभागा अंतर्गत वीजचोरांवरती मोठयाप्रमाणावर कारवाई केली जात आहे. वारंवार अधीकृतपणे वीज कनेकशन घेण्याबाबत विनंती करुनही अनेक लोक वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर आक्रमकपणे जोरदार मोहीम राबवून सोनखेड गावातील 15 तसेच कलंबर येथील 25 व लोहा शहरातील 10 लोकांविरोधात कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर हदगाव उपविभागातील कामारी गावातील 12 लोकांवरती वीजकायद्यान्वये वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा सावधान : इसापूर धरणाचे पाच दरवाजे उघडले, 240.27 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग -

पथकात हे आहेत अधिकारी

लोहा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचीन दवंडे, कनिष्ठ अभियंता शिवकुमार शेंबाळे, राधेश्याम जाधव तसेच हदगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. टी. ढवळे कनिष्ठ अभियंता सुदर्शन जाधव, विनोद वाठोरे तसेच जनमित्र या कारवाईत सहभागी होते. रोहीत्र नादुरूस्त होण्याच्या प्रकारात होणारी वाढ लक्षात घेता यापुढेही अशी कारवाई मोठयाप्रमाणावर करण्यात येणार असून वीजग्राहकांनी अधिकृतपणेच वीज वापर करावा. त्याचबरोबर आपला वीजपुरवठा अखंडीत रहावा यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेत वीज चोरून वापरणाऱ्यांना मज्जाव करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL: Action taken against 52 Akode Bahadur for stealing electricity nanded news