महावितरण : नवीन बदली धोरणातील जाचक अटी रद्द करा- अधिकारी संघटना आक्रमक

प्रल्हाद कांबळे
Sunday, 23 August 2020

महावितरणची ग्राहक संख्या दरवर्षी वेगाने वाढत आहे. त्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. मात्र महावितरणमध्ये सध्या प्रत्येक संवर्गात मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत

नांदेड : महावितरणच्या नवीन बदली धोरणातील जाचक अटी रद्द कराव्यात. तसेच अनिवार्य रिक्त पदांच्या संकल्पनेची एकतर्फी अंमलबजावणी करू नये. सर्व अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या तातडीने कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेने केली आहे.

महावितरणची ग्राहक संख्या दरवर्षी वेगाने वाढत आहे. त्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. मात्र महावितरणमध्ये सध्या प्रत्येक संवर्गात मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत. असे असतानाही महावितरणने ता. सात ऑगस्ट रोजी नवीन बदली धोरण जाहीर करून विविध कार्यालयांतील अनेक पदे 'अनिवार्य रिक्त' या नावाखाली रिक्तच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण रद्द करून अधिकाऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी संघटनेने ता. १४ ऑगस्टला पत्राद्वारे केली होती. 

हेही वाचा पुन्हा काका- पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव धुळीला -

खालील पदे रिक्त ठरविल्याने गंडांतर 

मात्र पत्राची दखल न घेता ता. १८ ऑगस्टला महावितरण व्यवस्थापनाने परिपत्रकाद्वारे एकतर्फी अनिवार्य रिक्त पदे घोषित करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना दिले. या नवीन धोरणानुसार महावितरणमध्ये अतांत्रिक अधिकाऱ्यांची ३३८ पदे अनिवार्य रिक्त ठरवली आहेत. त्यात वित्त व लेखा संवर्गातील २१६, माहिती तंत्रज्ञान संवर्गातील ५३, मानव संसाधन संवर्गातील ४८, विधी संवर्गातील ९, औद्योगीक संबंध संवर्गातील ७ व जनसंपर्क संवर्गातील ५ पदे अनिवार्य रिक्त ठरवली आहेत. यामागची प्रशासनाची भूमिका काय आहे, याबाबतचा अद्याप तरी काही उलगडा झालेला नाही.

येथे क्लिक करा - दोनशे रुग्णांची शनिवारी कोरोनावर मात, नऊ जणांचा मृत्यू; १२२ जण पॉझिटिव्ह

महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा 

अनेक कार्यालयातील पदे अनिवार्य रिक्त ठरवल्याने मागील एक ते दोन वर्षापासून ज्या अधिका-यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते, अशा अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीची दारे बंद झाली आहेत. त्यामुळे महावितरणच्या सर्व अतांत्रिक अधिकारी वर्गात असंतोष पसरला आहे. महावितरणने हे बदली धोरण व अनिवार्य रिक्त पदांची संकल्पना रद्द करून सध्या उपलब्ध असलेल्या रिक्तपदी संबंधित अधिकाऱ्यांची विनंती बदली करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक, सरचिटणीस मनोज ठवरे, संघटन सचिव संजय खाडे यांनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संघटन सचिव संजय खाडे यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL: Repeal oppressive conditions in new transfer policy- Officers' Association is aggressive nanded news