महावितरण : नांदेड परिमंडळातील 174 तक्रार निवारण कक्षाव्दारे 26 हजार 140 ग्राहकांचे समाधान

प्रल्हाद कांबळे
Thursday, 30 July 2020

शंका निरसन झालेल्या ग्राहकांकडून 38 कोटी 46 लाख रूपयांचा वीजबीलांचा भरणा, वीजग्राहकांनी ऑनलाईन बील भरण्यास प्राधान्य द्यावे- मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर 

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळात ता. 27 जूनपासून सुरू केलेल्या 174 तक्रार निवारण कक्षाव्दारे आतापर्यंत 26 हजार 140 ग्राहकांशी संपर्क साधून लॉकडाऊन कालावधीतील वीजबिलाबाबत त्यांचे शंकानिरसन करण्यात आले. शंकासमाधान झाल्यानंतर वीजग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वाढत आहे. जुलै महिन्यात 1 लाख 72 हजार 841 वीजग्राहकांनी 38 कोटी 46 लाख रूपयांचा भरणा केला आहे. महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा उपयोग करून आपले वीजबिल तपासून पाहावे व शंका असली तरच नजीकच्या कार्यालयास भेट द्यावी तसेच वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

लॉकडाऊननंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंग व ग्राहकांच्या वीज वापरानुसार तीन महिन्यांचे एकत्रित व अचूक वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यास जूनपासून सुरुवात झाली. त्यानंतर वीजबिलाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या शंका समाधानासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. तसेच ग्राहकांना आपला ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिल पडताळून पाहणे सोयीचे व्हावे यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली. नांदेड परिमंडळ कार्यालयापासून ते उपविभागीय कार्यालयांपर्यंत 38 वेबिनारद्वारे 1293 सहभागी ग्राहकांना वीजबिलाची माहिती देण्यात आली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच विभागीय, उपविभागीय कार्यालयांनी 72 ग्राहक मेळावे घेवून ग्राहकांचे बिल समजावून समाधान करण्यात आले.

हेही वाचाआपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहिल्यास समाधान मिळते- न्यायाधीश धोळकीया

वीजबील भरणा केंद्रावर जावून 21 कोटी 61 लाख रुपयांचा भरणा 

नांदेड परिमंडळातील वीजबीलांबाबत समाधान झालेल्या वीजग्राहकांनी जून पासून वीजबील भरण्यास चांगला प्रतिसाद दिला असून तो अधिक वाढला पाहिजे या उद्देशाने महावितरण विविध माध्यमांचा वापर करत शंकांचे निरसन करत आहे. जूलै महिन्यात आजपर्यंत परिमंडळातील 99 हजार 332 वीजग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबील भरणा केंद्रावर जावून 21 कोटी 61 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर 73 हजार 509 वीजग्राहकांनी ऑनलाईन पघ्दतीचा वापर करत 16 कोटी 86 लक्ष रूपयांचा भरणा केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील 29 हजार 388 वीजग्राहकांनी 5 कोटी 59 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील 18 हजार 706 वीजग्राहकांनी 5 कोटी 5 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर सर्वाधिक भरणा नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार 75 ग्राहकांनी 25 कोटी 90 लाख रुपयांचा केला आहे.

या काळात घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला

एकीकडे लॉकडाऊनच्या काळात जनता घरात अडकून होती. या काळात घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला. त्या सर्वांना अखंडित वीजपुरवठा केल्याने लॉकडाऊन यशस्वी करण्यात महावितरणने मोलाचे योगदान दिले. गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वसुली घटल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा करता यावा यासाठी ग्राहकांनी आपले बिल नजिकच्या वीजबिल भरणा केंद्रात किंवा ऑनलाईन भरून सहकार्य करावे, एकरकमी वीजबील भरणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के सुट देण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

-दत्तात्रय पडळकर , मुख्य अभियंता , नांदेड, परिमंडळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL: Satisfaction of 26 thousand 140 customers through 174 grievance redressal cell in Nanded circle nanded news