esakal | महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरु; रोहित्रांची दुरुस्ती वेळेत पुर्ण करा : मुख्य अभियंता पडळकर

बोलून बातमी शोधा

महावितरण

महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरु; रोहित्रांची दुरुस्ती वेळेत पुर्ण करा : मुख्य अभियंता पडळकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरणच्या वतीने येणाऱ्या मान्सुनची दखल घेत मान्सूनपूर्व तयारी सुरु केली आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात नुकसान होते. त्यासाठी पावसाळ्याआधीच महावितरणने काम सुरु केले आहे. मान्सुनपुर्व कामांकडे दुर्लक्ष न करता सर्व कामे वेळेच्याआत पुर्ण करण्याचे निर्देश महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत.

पावसाळापुर्व वीज वाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे महावितरणने हाती घेतली आहेत. तापमानात प्रचंड वाढ झालेली असतानाही तळपत्या व रखरखत्या उन्हामध्ये चटके सहन करत महावितरणचे जनमित्र उन्हाला न जुमानता करोनाच्या संकटातही सर्व तयारीनिशी दुरूस्तीच्या कामाला लागले आहेत.

पावसाळयामध्ये वीजग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा सातत्याने मिळावा याकरिता पावसाळयापुर्वी महावितरणच्यावतीने देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणार्‍या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. यासोबतच उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, खराब झालेले कपॅसीटर बदलणे, आर्थिंग तपासणी करणे,लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरूस्त असल्यास नवीन लावणे, पॉवर ट्रान्सफॉर्मरची तेलाची पातळी तपासणे,ऑईल टॉपअप करणे, बॅटरीची सुस्थितीत ठेवणे, आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे,दुरूस्ती करणे. अशा प्रकारच्या विविध कामांचा समावेश या दुरूस्तीमध्ये आहे.

खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदविण्यासाठी स्थानिक कंट्रोल रूम शिवाय महावितरणचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक 24x7 उपलब्ध आहेत. याचा वापर वीजग्राहकांनी करावा.

पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी यासोबतच खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे असे निर्देश मुख्य अभियंता श्री. दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत. सोबतच वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडीत झालेल्या काळात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.