मुदखेड : पिस्तुलचा धाक दाखवून सराफाला लुटणारे पोलिस कोठडीत 

गंगाधर डांगे
Saturday, 7 November 2020

पिस्तुलचा धाक दाखवून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या दोघांना मुदखेड पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) रात्री दोघांना अटक केली.

नांदेड : मुदखेड शहरात सुभाष गंज, मोंढा भागात असलेल्या प्रसाद ज्वेलर्सचे मालक राघवेंद्र पवितवार यांना ता. ३१ आॅक्टोबर रात्री साडेआठच्या सुमारास पिस्तुलचा धाक दाखवून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या दोघांना मुदखेड पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) रात्री दोघांना अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना शनिवारी (ता. सात) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

ता. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या दरम्यान तीन दरोडेखोर हे दुचाकीवर सुभाष गंज, मोंढा भागात आले होते. येथील प्रसाद ज्वेलर्सचे मालक राघवेंद्र पवितवार हे आपली ज्वेलर्स दुकान बंद करून सोन्या-चांदीची व पैशाची बॅग सोबत घेऊन दुकाना बाहेर आल्यावर अचानक तीन दरोडेखोरांनी पवितवार यांना पिस्तुलचा धाक दाखवून बॅग पळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र सराफाने बॅग सोडली नसल्याने त्याच्या डोक्यात जबर मारहाण केली. यावेळी झटापटीत राघवेंद्र पवितवार या ज्वेलर्स व्यापारी यास दरोडेखोरांनी खाली पाडले. त्याचवेळी मोठ्यात एकच धावपळ उडाली. त्यादरम्यान दरोडेखोरांनी पवितवार यांना सोडून एका मोटर सायकल राठी यांच्या घरासमोरुण कालेजी देवी रोडवर पळ काढल्यामुळे पवितवार यांची सोन्या- चांदीची बॅग लुटण्यास दरोडेखोर अपयशी ठरले आहे. दरोडेखोरांनी बंदुकीची एक मॅक्झिम घटनास्थळी पडली असुन ते मॅक्झिम मुदखेड पोलिसांनी जप्त केले होते.

हेही वाचा - दूर्दैवी घटना : पती- पत्नीच्या पन्नास वर्षांचा प्रवास एकाच दिवशी संपला, परिसरात हळहळ -
 
दोघांनाही पोलिस कोठडी

मुदखेड पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या लुटमार करणाऱ्यांच्या शोधात तपासाची चक्रे वेगात फिरविली. अखेर शुक्रवारी (ता. सहा) श्री. निकाळजे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. भाले, हवालदार किरण तेलंग, केशव पांचाळ, चंद्रशेखर मुंडे, विजय आलेवार, रवी लोहाळे, बालाजी कदम आणि मकदुम यांनी रात्री सापळआ लावून मुदखेड शहरातून हनुमान कोंडिबा पल्लेवाड (वय २३) रा. सन्मित्र काॅलनी, मुदखेड आणि विश्वजीत दिगांबर गीरी (वय २०) रा. बापूसाहेबनगर, मुदखेड यांना ताब्यात घेतले. त्यांनी वरील गुन्हा कल्याची कबुली दिली असून पिस्तुल व खंजर तिसऱ्या मित्राजवळ असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.  

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mudkhed: Police arrested for robbing bullion at gunpoint nanded news