नांदेड : पकडलेल्या 'त्या' धान्याच्या ट्रकवर प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कारवाई

प्रभाकर लखपत्रेवार
Thursday, 15 October 2020

प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतरच धान्याबाबत खात्रीशीर सांगता येईल असा सावध पवित्रा तहसीलदार नायगाव यांनी घेतला आहे. त्यामुळे पकडलेल्या 'त्या' धान्याच्या ट्रकवर प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कारवाई होईल असे दिसून येत आहे. 

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : देगलूर येथून नायगाव तालुक्यातील कृष्णूर औद्योगीक वसाहतीकडे जात असलेला स्वस्त धान्याचा ट्रक रामतीर्थ पोलिसांनी चार दिवसांपूर्वी नरसी चौकात पकडला. सदरचे धान्य दुसऱ्या पोत्यात भरलेले असल्याने याबाबत निश्चित सांगता येत नाही. प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतरच धान्याबाबत खात्रीशीर सांगता येईल असा सावध पवित्रा तहसीलदार नायगाव यांनी घेतला आहे. त्यामुळे पकडलेल्या 'त्या' धान्याच्या ट्रकवर प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कारवाई होईल असे दिसून येत आहे. 

रामतीर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी रात्रीच्या गस्तीवर असतांना ( ता.१० ) आक्टोबर रोजी शनिवारी मध्यरात्रीनंतर देगलूर येथून धान्याने भरलेला ट्रक (क्रमांक एम. एच. १२ आर. ए. ७४१८) नांदेडकडे जात असतांना नरसी चौकात रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनी सोमनाथ शिंदे, चालक विकास भोळे, पोका शेख मुखतार, पोका प्रल्हाद आडे यांना मिळून आला. ट्रकला थांबवून कागदपत्रांची तपासणी केली असता चालकाजवळ ट्रकमधील धान्याच्या वाहतुकीबाबत कोणतेही कागदपत्रे आढळून आली नाहीत त्यामुळे धान्याबाबत संशय आला.

वाहनातील धान्याची तपासणी होण्यासाठी नायगाव तहसीलदार यांना लेखी कळविले.

 वाहन चालकाला वाहनातील माला विषयी चौकशी केली असता वाहनात तांदूळ असल्याचे सांगितले मात्र त्याचे बिल, कुठून आणला, कुठे नेत आहे या विषयीचे कुठलेच कागदपत्र त्यांच्याकडे नसल्याने व तांदूळ राशनचा तर नव्हे ना याची खात्री करण्यासाठी रामतीर्थ पोलिस पकडलेले ते वाहण ठाण्यात लावून वाहनातील धान्याची तपासणी होण्यासाठी नायगाव तहसीलदार यांना लेखी कळविले. 

तहसील कार्यालयाने काल (ता. १४) रोजी ट्रकमधील तांदळाची पाहणी केली

रामतीर्थ पोलिसांनी पाठवलेल्या पत्रानुसार नायगाव तहसील कार्यालयाने काल (ता. १४) रोजी ट्रकमधील तांदळाची पाहणी केली. यावेळी तांदूळ हा शासनाच्या पोत्यात नव्हता तर पांढऱ्या रंगाच्या पोत्यात दिसून आला. त्यामुळे हा तांदूळ राशनचा आहे की नाही हे सांगता येणार नाही असे मत पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार भोसीकर यांनी नोंदवले व तसे लेखी कळवले आहे. 

प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतरच कारवाई

त्यामुळे ट्रकमधील ता़दूळ तपासण्यासाठी परभणीच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार असून. प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतरच कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान सदर प्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात तक्रारी होण्याचे संकेत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Action will be taken on the seized 'grain' truck only after the laboratory report nanded news