Nanded : अशोक चव्हाणांच्या पक्षांतर चर्चेला पूर्णविराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Chavan

Nanded : अशोक चव्हाणांच्या पक्षांतर चर्चेला पूर्णविराम

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणाऱ्या बातम्या व चर्चा मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षभरापासून रंगत आहेत. दरदिवशी चव्हाण लवकरच भाजपात जाणार, राहूल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडताच चव्हाण कॉंग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा बातम्या पेरल्या जात होत्या. परंतु, शुक्रवारी (ता.२८) चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त व भारत जोडो यात्रेनिमित्त पक्षातील काही ज्येष्ठ नेते शहरात दाखल झाले होते.

या वेळी याच ज्येष्ठ नेत्यांनी चव्हाण कदापीही कॉँग्रेस सोडणार नाहीत, याची ग्वाही दिली. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे पक्षांतर चर्चेला पूर्णविराम मिळाल्याने शुक्रवार चव्हाणांसाठी लक्की-डे ठरला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा शुक्रवारी वाढदिवस असल्यामुळे शहरात विविध ठिकाणी त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रतिवर्षी त्यांचा वाढदिवस त्यांच्या आनंदनिलयम या निवासस्थानी साजरा केला जातो. कोरोना काळानंतर प्रथमच यावर्षी कुसुम सभागृहात त्यांचा वाढदिवस साजरा झाला.

यावेळी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावून विविध विषयांवर चर्चा झाली.समारोपप्रसंगी चव्हाण म्हणाले की, माझ्या घराण्याची राजकीय पार्श्वभूमी सर्वांसमोर आहे. यासंदर्भात वेगळा खुलासा करण्याची गरज नाही. नांदेड जिल्ह्यातील जनतेने कै. शंकरराव चव्हाणांवर नेहमीच प्रेम केले. आज आमच्या सर्वांमागे त्यांची पुण्याई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासाची प्रक्रिया न थांबणारी

अभिष्टचिंतन सोहळ्याला कार्यकर्ते व हितचिंतकांची मोठी गर्दी होती. या कार्यक्रमानंतर चव्हाण यांनी अनेक ठिकाणी वैयक्तिक भेटी देऊन सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. सायंकाळी महापालिकेतील नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या सत्कराला उपस्थिती लावली.

तेथे श्री. चव्हाण म्हणाले की, विकासाची प्रक्रिया ही न थांबणारी आहे. जनतेच्या मागण्यासंदर्भात विधीमंडळात ज्या कामांना मंजुरी मिळाली ती कामे रोखून धरता येत नाही. कारण सभागृहाने त्या बजेटला मंजुरी दिलेली असते. विकास कामे रोखून शहर व जिल्ह्याला वेठीस धरणे लोकशाहीला घातक असून ते अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.