नांदेड : साडेदहा कोटींचा रस्ता निकृष्ट दर्जाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded bad Road construction of Ten and half crores

नांदेड : साडेदहा कोटींचा रस्ता निकृष्ट दर्जाचा

बरबडा : नांदेड जिल्ह्यापासून जवळच असलेल्या नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम टेंडरनुसार केले जात नसून रस्त्याचे काम निकृष्ट होत असताना सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथील काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून, रस्त्याच्या कामाची मुदत संपून गेली आहे. मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाकडे अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बरबडा येथून जाणाऱ्या व नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील गोदमगाव - अंचोली - हिप्परगा - कुष्णूर - बरबडा - टाकळी या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम सुरू आहे. मुदत संपूनही हे काम कासवगतीने सुरू आहे. त्यातही होण्याआधीच काम सुमार दर्जाचे झाले आहे. याला अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. तर दुसरीकडे अभियंता व कंत्राटदाराच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या तालुक्यातील गोदमगाव-कृष्णूर ते टाकळी हा २२ किलोमीटरचा रस्ता कामाची मुदत संपुनही अद्याप काम झाले नाही. जे काम होत आहे तेही कासवगतीने सुरू आहे.

या कामाकडे ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे आधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. या २२ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन आमदार वसंत चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली व दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्यांसाठी तब्बल दहा कोटी ४६ लाख रुपयांचा निधीही मिळाला. सदरचे काम नांदेड येथील गुरू रामदास कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. मोठा गाजावाजा करीत सदरीच्या रस्त्याच्या कामाचा सुभारंभ तत्कालीन आमदार वसंत चव्हाण व इतर मान्यवरांच्या उपस्थितत (ता.११) सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात आला.

सदरील काम (ता.२२) सप्टेंबर २०१८ रोजी संपायला पाहिजे होते; पण अद्याप पूर्ण झाले नाही. बरबडा गावासाठी महत्त्वाच्या आसलेल्या या रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहेत. तर वेळेत काम झाले पाहिजे या बाबत अधिकारीही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष देऊन काम लवकरात लवकर व दर्जेदार करण्याच्‍या संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला सूचना कराव्यात, अशी मागणी बरबडा-वजीरगाव ग्रामस्थांतून होत आहे.

बरबडा विकासाच्या प्रवाहापासून कोसोदूर

बरबडा येथील सर्वांगीण विकास हा रस्त्याविना खुंटला आहे. बरबडा ते आंतरगाव, बरबडा ते बरबडावाडी, काहाळा ते बरबडा, बरबडा ते रूई, मनुर, सावरखेड रस्ता असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. त्यामुळे विकासाच्या प्रवाहापासुन ग्रामीण भाग आजही कोसोदुरच असल्याचे वास्तव पुढे येत आहे.

सदर भागात काळी जमिन असल्यामुळे आणि वाळू व मातीची ओव्हर लोडिंग वाहनामुळे रस्ता दबून दुरवस्था होत आहे. लवकरच सुधारणा केली जाईल.

- संतोष पायघन, अभियंता.

काहाळा ते बरबडा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहने कसे चालवावे काही समजनासे झाले आहे.

- कैलास सूर्यवंशी, ग्रामस्थ.

Web Title: Nanded Bad Road Construction Of Ten And Half Crores

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top