Nanded : भाजपच्या राजनीतीमुळे समाजामध्ये तेढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Congress Bharat Jodo Yatra

Nanded : भाजपच्या राजनीतीमुळे समाजामध्ये तेढ

नांदेड : देशात बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त आहेत. या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असताना भारतीय जनता पक्षाकडून राजनिती केल्या जात आहे. या राजनितीमुळे समाजा-समाजात तेढ निर्माण होत आहे, अशी टिका करत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेसाठी देशातील सर्वात चांगले नियोजन नांदेडचे असेल, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेनिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ शिष्टमंडळ रविवारी (ता.दोन) नांदेडात आले होते. याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरिअल सभागृहात ते पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी अखिल भारतीय महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, कॉंग्रेसचे प्रभारी संपतकुमार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, यशोमती ठाकूर, महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, संतोष पंडागळे, डॉ. मीनल खतगावकर आदी उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले की, भारत जोडो ही पदयात्रा ऐतिहासिक असून केरळ, कर्नाटकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविधतेतून एकता हीच खरी देशाची ताकद आहे. देशांमध्ये सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये बेरोजगारीचा उद्रेक, कारखानदारी, महागाईचा भस्मासूर यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. नोव्हेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये यात्रेचे आगमन होणार असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात या यात्रेसाठी देशात सर्वाधिक चांगली तयारी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपची राजनिती तेढ निर्माण करणारी :

सध्या भाजपकडून जी राजनिती केल्या जात आहे, त्यामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण होत आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. वंदे मातरम व जय भारत हे कॉंग्रेसने पहिल्यांदा आणले. त्यावेळेस आरएसएस हे मान्य करायला तयार नव्हती, अशी परिस्थिती होती. आता मात्र वंदे मातरमसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्ती करण्यात येत आहे. यास आमचा विरोध नाही, वंदे मातरम म्हणायला काही हरकत नाही. पण त्याची सक्ती करणे चुकीचे आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राहुल गांधी यांचे सहा मुक्काम नांदेड जिल्ह्यात

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेला देशभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशात एकता, बंधुत्व देश जोडण्यासाठी ही महत्त्वाची नांदी ठरणार आहे. ही यात्रा केवळ राजकीय पक्षाची नसून या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी होत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा नांदेडमध्ये येण्याची शक्यता आहे. ही यात्रा देगलूर-नायगाव-नांदेड-अर्धापूर-कळमनुरी-हिंगोली-वाशिम-जळगावमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात १८ रात्रीचे मुक्काम असणार आहेत. त्यात सहा मुक्काम नांदेड जिल्ह्यात असून १२० किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी कधीही भाजपात जाणार नाही. भाजपाकडून केवळ माझ्या बाबतीत अफवा पसरवल्या जात आहेत. वास्तविक पाहता तसे काहीही नाही. वारंवार या अफवांना उत्तर देणे मी योग्य समजत नाही.

- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री.