
नांदेड : रस्ता रूंद झाला तरी वाहतूक समस्या जैसे थे
भोकर : शहरात प्रारंभी पासून दक्षिण भारताला जोडणारा रस्ता असल्याने वाहनांची गर्दी असते. आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ रस्ता म्हणून घोषित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता रूंद करण्यात आल्याने वाहतूक समस्यावर तोडगा निघेल अशी आशा होती पण आजही नागरिक व वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते आहे. नागरीकांची होणारी हेळसांड दुर करण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भोकर शहर हे तेलंगणा सिमेलगत असून दक्षिण भारताला जोडणारा मुख्य रस्ता शहरातुन जातो. वाहनाची होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने ऊशिरा का होईना रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग रस्ता म्हणून घोषित केला आहे. यामुळे रस्त्याचे भाग्य उजळले आहे. विविध अत्यावश्यक विकासात्मक कामे मार्गी लागले आहेत.
जड वाहनांना शहरातुन प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तरी बरीच वाहने नियम धाब्यावर बसवून शहरातून धूम ठोकतात. वाहतूक पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खर तर नगरपालिका, महसूल विभाग, पोलिस, आरटीओ यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणे गरजेचे आहे. याकडे संबंधित विभाग मात्र ढुंकूनही पाहत नाही. यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे कळते. सुंदर शहर स्वच्छ शहर करण्यासाठी फारसे लक्ष दिले नाही पण रस्ता मोकळा श्वास घेण्यासाठी रूंदीकरण करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होईल अशी आशा होती.
वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष
याच रस्त्यावर चारचाकी, दुचाकी, अवैध वाहतुकीची वाहने, अॅटोरिक्षा आणि व्यापारी आपल्या दुकानातील साहित्य बिनधास्त रस्त्यावर ठेवतात. रस्त्याच्या कडेला वाहनांसाठी स्वंतत्र पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन शहरात उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. रस्ता रूंद झाला पण वाहतूक समस्या आजही जैसे थे आहे. संबधितांनी त्वरीत लक्ष देऊन नागरिक व वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी त्रस्त झालेल्या जनतेची मागणी आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Web Title: Nanded Bhokar Wide Road Transport Problems
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..