नांदेडला आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय परिवर्तनाची नांदी

पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन
Bhumipujan of Padma Shri Institute of Medical Sciences and Research Center
Bhumipujan of Padma Shri Institute of Medical Sciences and Research Centersakal

नांदेड : जगात कायमचं असं काही नसतं, परिवर्तन किंवा बदल होणं हेच कायम असत असं म्हटलं जातं. जीवनातील प्रत्येक क्षेत्राला हा नियम लागू आहे. वैद्यकीय क्षेत्र या नियमाला अर्थातच अपवाद असू शकत नाही. शनिवारी नांदेड शहरात पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच भूमिपूजन होत आहे. त्या निमित्ताने गेल्या चार दशकात येथील आरोग्य सुविधांमध्ये कसा बदल होत गेला याचा आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल.

आरोग्य सुविधांच्या आघाडीवर गेल्या चार दशकात आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे रुग्णाची तपासणी, निदान आणि उपचार पद्धतीवर आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भारी प्रभाव झालेला आहे. पूर्वी एकच डॉक्टर, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, गर्भवती महिलांना, अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना वगैरे सगळ्या पेशंटना तपासून यथाशक्ती उपचार करत असे. यालाच फॅमिली डॉक्टर असं म्हटले जात असे. या फॅमिली डॉक्टरला अनेक कुटुंबासाठी फक्त डॉक्टर नाही तर गाईड - फ्रेंड - फिलॉसॉफरची भूमिका घ्यावी लागत असे. नांदेडात अशा फॅमिली डॉक्टरच्या यादीत डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. प्र. दि. पुरंदरे आणि डॉ. सोहनलाल अवस्थी यांची नांवे अग्रक्रमाने घेतली पाहिजेत. त्यानंतर (कै.) डॉ. ना. गो. भालेराव, (कै.) डॉ. वाडेकर, (कै.) डॉ. मोतेवार, (कै.) डॉ. नळदकर, (कै.) डॉ. बजाज इत्यादींचे आधुनिक वैद्यकशास्त्रीय उपचार पद्धतीची नांदेड शहरात पायाभरणी केली.

त्यानंतर स्वतःचं, एकट्याचं रुग्णालय निर्माण करून, एक हाती २४ तास रुग्णसेवा देण्याचं काम करण्यापेक्षा एकाच स्पेशालिटीचे चार लोक एकत्र येऊन रुग्णालय सुरू केल्यास आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढू शकते, कोणत्याही एका डॉक्टरवर सतत कामाचा ताण राहणार नाही आणि पेशंट्सना देखील २४ तासात कोणत्याही वेळेस एक पदव्युत्तर डॉक्टरचं मार्गदर्शन मिळेल ही संकल्पना खर्‍या अर्थाने नांदेडमध्ये ‘अश्विनी ’ ग्रुपने मांडली. त्यानंतर ‘मल्टीस्पेशालिटी’ हॉस्पिटल सुरू करण्याचा पायंडा सुरु झाला. ज्या वैद्यकीय सुविधांसाठी पूर्वी मुंबई, पुणे, हैदराबादसारख्या शहरात जावं लागायचं त्या जवळपास सर्व सुविधा आज नांदेडमध्ये उपलब्ध आहेत, असं म्हणता येईल. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्याच्या सीमेवरील नांदेड हे एक प्रमुख ‘मेडिकल हब ’ झाले आहे, असं म्हणावयास हरकत नाही.

सध्या समाजात आरोग्य विम्याविषयी जागरूकता भरपूर वाढली आहे. या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना एकाच छताखाली नेहमी लागणार्‍या, उपचारासाठी कठीण असणार्‍या आजारांसाठी, कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या धर्तीवर कार्य करणार्‍या आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून पाऊले उचलणार्‍या एका भव्य हॉस्पिटलची नांदेडला आवश्यकता होती. पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होण्याची शक्यता आहे. या हॉस्पिटलची खूप आणि वेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रशस्त जागेत एक टोलेजंग हॉस्पिटलची इमारत ‘ग्रीन बिल्डिंग’ या संकल्पनेतून साकार होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील ही नवीन अशी संकल्पना आहे. नांदेडमध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच कार्यान्वित केली जाणार आहे. रुग्णांच्या आरोग्यविषयक नोंदी या डीजीटल पद्धतीने होऊन एक पेपरलेस डेटा तयार करून त्याचा उपयोग संशोधनाच्या कार्यासाठी केला जाणार आहे. नजीकच्या भविष्यात साकार होणारं हे रुग्णालय समाजातील प्रत्येक आर्थिक स्तरातील वर्गासाठी या हॉस्पिटलचे दरवाजे उघडे राहणार आहेत.

आजचे या हॉस्पिटलचे भूमिपूजन म्हणजे नांदेड येथील आरोग्य सुविधांना एक वेगळं वळण मिळणार, येथील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय परिवर्तन होण्याची नांदी आहे. नांदेडच्या रुग्णसेवा - सुविधांच्या बाबतीत, या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एक इतिहास रचला जाणार आहे. अशा संकल्पना मनात ठेऊन या हॉस्पिटलची निर्मिती करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. या हॉस्पिटलच्या संचालक मंडळास हे स्वप्न साकार व्हावं यासाठी शुभेच्छा!

-डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com