नांदेड : पालकमंत्र्याच्या मतदार संघात दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीला मोठे भगदाड

गंगाधर डांगे
Wednesday, 27 January 2021

 कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी

मुदखेड (जिल्हा नांदेड) : बारड भोकर राष्ट्रीय महामार्गावरील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे उघड झाले. बारड बसस्थानकजवळ बांधण्यात आलेल्या एका पुलावर सिमेंट काँक्रेट व पाईप फुटून मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या महामार्गावरील नाली व पुलाचा बांधकाम दर्जा किती निकृष्ट आहे हे समोर आले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा हा मतदार संघ आहे.  

बारड- भोकर राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांध कामाचे पितळ उघडे पडले असून बारड बसस्थानक परिसरात असलेल्या मुख्य मार्केट समोरील दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नालीवरील स्लँब कोसळून मोठे भगदाड पडल्याने काम मोठ्या प्रमाणात निकृष्ट केल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत निकृष्ट कामाची पाहणी करुन ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यातील दोषी अधिकारी व कंट्रक्शनवर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे

गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग वरील कामे संथ गतीने सुरु असून अत्यंत निकृष्टपणे कामे होत आहेत. बारड परिसरात रस्त्यावरील दोन किलोमीटरचे नाली कामे सुरु असून नाली कामावर कमी व निकृष्ठ गजाळी, सिमेंटचा कमी वापर करुन पाण्याची क्युरिंग न करता बोगसपणे नाली काम सुरु असल्याने या कामाला लगेच तडे पडत असल्याचे दिसून येत आहे. तर या कामाचा दर्जा पाहणारे अधिकारी बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालुन या निकृष्ट कामाची बिले पण लगेच अदा करण्यात येत असल्याचे समजते.

चक्क बसस्थानक परिसरातील बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीवरील स्लॅपला मोठे भगदाड पडल्याने कामावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी अरुंद रस्ता तसेच निकृष्ट होणाऱ्या कामाबाबत बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन या होत असलेल्या बोगस कामाबाबत तक्रार केली होती. त्यांच्या सुचनेनुसार त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाला भेट देऊन काम दर्जेदार व निविदा प्रमाणे करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यामध्ये साटेलोटे असल्याचे बोलले जात असून निकृष्ट कामाकडे काना डोळा करण्यात येत आहे. पुढे पाठ मागे सपाट म्हणण्याची वेळ राष्ट्रीय महामार्गावरिल होणाऱ्या नाली कामाबाबत म्हणण्याची वेळ आली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भगदाडाबाबत काँग्रेसचे जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, सामाजिक कार्यकर्ते नरसिंग आठवले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे झालेल्या निकृष्ठ दर्जाची तक्रार केली असुन कोट्यवधी  रुपये खर्च करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील कामावर शासनाच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु या ठिकाणी बोगसरित्या काम करुन अक्षरशा: शासनाच्या दर्जेदार कामाला छेद देत कोटी रुपयांची कामे बोगसरित्या होत असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या बोगस कामाची चौकशी करुन संबंधित कंट्रक्शन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याची चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A big crack in the drain made in the Guardian Minister's constituency two days ago nanded news