Nanded : माझी सालदारकी संपत आली ; हरिभाऊ बागडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded BJP MLA Haribhau Bagde

Nanded : माझी सालदारकी संपत आली ; हरिभाऊ बागडे

फुलंब्री : ‘‘माझी सालदारकी संपत आली आहे. आता केवळ दीड वर्ष बाकी आहे. आता पुन्हा सालदार होण्याची माझी मुळीच इच्छा नाही’’, असे म्हणत विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी महत्त्वाची घोषणा केली. ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक आपण आता लढणार नाही, इच्छुकांनी तयारी लागावे, असे आवाहन त्यांनी दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या घोषणेमुळे इच्छुकांना प्रत्यक्षपणे तयारी करण्यासाठी मैदानात मोकळे झाले आहे.

फुलंब्री येथील समता विद्या मंदिर शाळेच्या परिसरात नगराध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे शुक्रवारी (ता.२७) आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलानंतर आमदार बागडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, माझे सालदारकीचे केवळ दीड वर्ष बाकी असून, पुन्हा सालदार होण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे अनेकांच्या आशा व आकांक्षा निश्चितच वाढल्या आहे. अशा सर्वांचे परमेश्वर भलं करो या सर्वांनाच माझ्या शुभेच्छा आहे. अशा शब्दांत आमदार हरिभाऊ बागडे यांनी शुभेच्छा दिल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.

परिणामी, भाजपकडून आमदारकी लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांना तयारी करता येईल. भाजपकडून फुलंब्री विधानसभेसाठी माजी जिल्हा परिषद सभापती अनुराधा चव्हाण, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे हे इच्छुक आहे.

भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरण मला माहिती आहेत. थांबण्याचा हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी स्वतःही पक्षप्रमुख असतो तरीही मी थांबण्याचाच निर्णय घेतला असता. त्यामुळे आगामी काळात पक्ष जो काही निर्णय घेईल तो मला मान्यच राहील.

- हरिभाऊ बागडे, आमदार फुलंब्री