
Nanded : आता रक्तही महागले...
नांदेड : महागाईचा जमाना असल्यामुळे प्रत्येक वस्तू महागली आहे. महागाईच्या या जमान्यात आता रक्तही महागले आहे. एका रक्त पिशवीसाठी शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे खासगी रक्तपेढीतील एका रक्त पिशवीसाठी आता एक हजार ५५० रुपये मोजावे लागतील.
तर शासकीय रक्तपेढीतील एका रक्त पिशवीसाठी एक हजार शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. रक्ताचे वाढलेले शुल्क गरीब रुग्णांच्या खिशाला मात्र परवडणारे नाही.
नव्या दराप्रमाणे रक्त पिशवी खरेदी करताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा भुर्दंड पडतो. त्यामुळे रुग्णालयात रक्ताची जमवाजमव करणे त्यांना कठीण जात आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या सुचनेनुसार रक्त पिशवीच्या दरवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवीन दर जाहीर केले आहे.
यापुढे धर्मादाय, खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या बाटलीची किंमत एक हजार ४५० वरून एक हजार ५५० रुपये इतकी केली आहे. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये एक हजार ५० रुपयांवरून एक हजार शंभर रुपये इतकी झाली आहे.
पूर्वी शासकीय रक्तपेढीत बाहेरच्या रुग्णांसाठी रक्तपिशवी ८५० रुपयांना होती. इतर सरकारी रक्तपेढ्यांच्या तुलनेत दर कमी होते. मात्र, आता शासन निर्देशानुसार शनिवारपासून (ता.११) रक्त पिशवीचे एक हजार शंभर रुपये नवीन दर लागू झाले आहेत.
अशासकीय रक्तपेढी
संपूर्ण रक्त - एक हजार ५५० (एक पिशवी)
पॅक्ड रेड सेल - एक हजार ५५० (एक पिशवी)
फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा - ४०० (एक पिशवी)
प्लेटलेट काॅन्सन्ट्रेट - ४०० (एक पिशवी)
शासकीय रक्तपेढी
संपूर्ण रक्त - एक हजार १०० (एक पिशवी)
पॅक्ड रेड सेल - एक हजार १०० (एक पिशवी)
फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा- ३०० (एक पिशवी)
प्लेटलेट काॅन्सन्ट्रेट - ३०० (एक पिशवी)