Nanded Breaking ; सात वर्षीय मुलगी, चार वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

कोरोना बाधित रग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या बाधित रुग्णांमध्ये लोहार गल्लीतील दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नांदेड : लोहार गल्ली येथील कोरोना बाधीत वृद्ध दांम्पत्यांच्या संपर्कातील संशयीतांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील मंगळवारी (ता.दोन जून) दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे.

मुंबईहून प्रवास करून आलेल्या मुखेड तालुक्यातील दोन रुग्णांचे रिपोर्ट रविवारी (ता. ३१ मे) पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी (ता. एक जून) पुन्हा नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण महापालिका हद्दीतील असून शिवाजीनगर भागात पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण तर देगलूर नाका परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा - नांदेडकरांना मोठा दिलासा : काल सोळा रुग्ण कोरोनामुक्त

मंगळवारी (ता. दोन जून) आलेल्या अहवालामध्ये सात वर्षीय मुलगी आणि चार वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधित वृद्ध दाम्पत्याच्या संपक्रातून ही बाधा झाल्याचे डॉ. भोसीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

मंगळवारी सकाळी एकूण ५२ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दोन बालकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच ४७ अहवाल निगेटीव्ह असून तीन अहवाल अनिर्णित आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे नांदेडकरांमध्ये आता चिंता वाढताना दिसत आहे. 

हे देखील वाचाच - पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू
 
लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण
मागील दोन महिन्यापासून शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवाजीनगर, वजिराबाद, श्रीनगर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. परंतु मागील आठवडाभरापासून बाजारपेठ हळूहळू सुरू होत असतानाच शिवाजीनगर भागातील वर्दळीच्या व बाजारपेठ असलेल्या परिसरात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा बाजारपेठेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोरोना मीटर

  • बाधित व्यक्तींची एकूण संख्या झाली १५१
  • १२० जणांना घरी सोडले
  • २३ जणांवर उपचार सुरू
  • ८ बाधीतांचा मृत्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Breaking; Seven-year-old girl, four-year-old boy positive Nanded News