नांदेड : व्यवसायिकांनो कोरोना टेस्ट करा अन्यथा दुकाने बंद, आयुक्तांनी काढले आदेश

शिवचरण वावळे
Sunday, 9 August 2020

महापालिकेच्या वतीने कोरोना तपासणी सुरु असून, दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात आढळून येत आहे. त्यानुषंगाने व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. 

नांदेड : महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनामध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲटीजेन टेस्ट करून घ्यावी. अन्यथा दुकाने बंद करावीत, असे सक्तिचे आदेश नुकतेच महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी काढले आहेत.
 
आयुक्त डॉ. लहाने यांनी काढलेल्या आदेशात म्हटले की, नांदेड वाघाळा महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या वतीने कोरोना तपासणी सुरु असून, दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात आढळून येत आहे. त्यानुषंगाने व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. 

कोरोना तपासणीसाठी महापालिकेचे ॲन्टीजन तपासणी पथक आपल्या कार्यक्षेत्रात येणार असून, ही तपासणी करून घेणे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. जे व्यवसायिक तपासणी करणार नाहीत असे लक्षात अल्यास शासनाने लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार प्रतिष्ठाने बंद करून नियमानुसार त्यांच्यावर कार्यवारी करण्यात येईल, असे डॉ. लहाने यांनी आदेशामध्ये म्हटले आहे. 

हेही वाचा- उपचारासाठी मेट्रो सिटी, नांदेडच्या विकासाची कोरी पाटी...

आठवडाभरात जिल्ह्यातील बाधितांची संख्या दुप्पट

सध्या शहरी व ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध तसेच दारोदारी जाऊन संशयितांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या दरम्यान संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. या तपासणीतून अनेक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या हेतुने शासन स्तरावर युद्धपातळीवर आरोग्य सेवा सुरु आहे. यामुळे आठवड्यात जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. 

हेही वाचा- शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे? ते वाचाच ​

कोरोना साखळी ब्रेक होणार का?
 
लॉकडाऊन असले तरी, पाच दिवस शहरातील प्रतिष्ठाने, व्यवसाय, उद्योग कमी अधिक प्रमाणातू सुरु ठेवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. परंतु या दरम्यान त्या ठिकाणी खबरदारी घेतली जाते का? दुकानावर येणारी व्यक्ती किंवा दुकानमालक अथवा त्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती हे स्वतःची कशा पद्धतीने काळजी घ्यावी तशी काळजी घेतली जात नसल्याने देखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असत्याचा संशय व्यक्त करण्यात यतो. त्यामुळे कोरोनाची वाढत जाणारी साखळी कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे या हेतूने आता शहरातील कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक मार्केट, सराफा मार्केट, लहान मोठे उद्योग, व्यावसायीक यांना व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता अँन्टीजेन टेस्ट'करुन घ्यावी लागणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Businessmen Should Test The Corona Otherwise Shops Will Be Closed Orders Issued By The Commissioner Nanded News