नांदेड : राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करा : खा. प्रताप पाटील चिखलीकर 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 9 December 2020

राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करा, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

नांदेड- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशातील रस्त्यांचा कायापालट होत आहे. राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रासह अनेक राज्य जोडली जात असून नांदेड जिल्ह्यातूनही राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. त्यामुळे रखडलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने पूर्ण करावीत अशी मागणी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग, जलबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील रखडलेल्या कामांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 नागपूर-तुळजापूर (भाग नांदेड- लातूर) या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यापासून रखडले आहे. तुळजापूर मार्गे औसा- चाकूर, चाकूर- लोहा- नांदेड- वारंगा या प्रकल्पाचे उद्घाटन 19 एप्रिल 2018 रोजी झाले होते. त्यानंतर रस्ता उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग 361 प्रकल्पाच्या कामामध्ये नांदेड जिल्ह्यातील जवळपास 80. 200 कि.मी. चे काम आहे. जिल्हा प्रशासनाकडून सदर कामासाठी भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, याशिवाय नांदेड जिल्ह्याच्या विकासाकरिता अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या ई. सी. 23 वाटूर- जिंतूर- नांदेड राष्ट्रीय महामार्ग 752 (ग्रीन फोल्डचा डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यातून जात असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील दळणवळण व वाहतुकीला गती प्राप्त होणार आहे. पर्यायाने मराठवाड्याच्या विकासाची गती वाढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावेत अशी मागणी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी या भेटीत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली.

दरम्यान केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत नांदेड लोकसभा मतदार संघातील रस्त्यांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देवून रखडलेली कामे जलद गतीने करण्यात यावी अशीही मागणी खा. चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Complete the stalled work of National Highway at a fast pace mp pratap patil nanded news