esakal | नांदेड : जिल्हाधिकारी व आमदारांच्या दौऱ्यानंतरही कुंटूर- धनंज रस्त्याची दुरावस्था कायम 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हाधिकारी व आमदारांनी दौरा करुन रस्त्याची पाहणी केल्यानंतरही या भागातील नागरिकांची अद्यापही मरणयातनातून सुटका झाली नाही.

नांदेड : जिल्हाधिकारी व आमदारांच्या दौऱ्यानंतरही कुंटूर- धनंज रस्त्याची दुरावस्था कायम 

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगांव (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील कुंटूर ते धनंज या नऊ कि.मी. च्या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची ता. दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी व आमदारांनी दौरा करुन रस्त्याची पाहणी केल्यानंतरही या भागातील नागरिकांची अद्यापही मरणयातनातून सुटका झाली नाही. रस्त्याची जैसे थेच परिस्थिती असल्याने पाहणी दौरा म्हणजे केवळ स्टंटबाजी तर नव्हती ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागातील खाबुगिरी व राजकीय नेत्यांची अनास्था यामुळे सांगवी, मेळगाव व धनंज या तीन गावातील नागरिकांना मागच्या २० वर्षांपासून मरणयातना सहण कराव्या लागत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वाड्यावरच्या नेत्यांची वोट बँक असलेल्या या भागातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे त्यांनीही कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या रस्त्याची प्रचंड दयनिय अवस्था झाली असून या राज्य मार्गापेक्षा पांदन रस्ता बरा म्हणण्याची वेळ या भागातील नागरिकावर आली आहे.

राजकीय नेत्यांनी डांबरीकरण करण्याचे गोड आश्वासन दिले होते

 कुंटूर ते धनंज या नऊ कि.मी. च्या रस्त्यावरुन प्रवास करताना काय त्रास होतो हे त्या भागातील नागरिकापेक्षा इणर कुणीही चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाही. दगड, गोटे, रस्त्यातील भले मोठे खड्डे चुकवून प्रवास करावा लागतो तर पावसाळ्यात गुडगाभर चिखलात रस्ता शोधून घर गाठावे लागते. यात आजपर्यंत अनेकजन जायबंदी झालेले आहेत. कुणाला कायमचे अपंगत्व आलेले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड संतापलेल्या नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला पण दरवेळी खोट्या आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्याचबरोबर मागच्या विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यानंतर राजकीय नेत्यांनी डांबरीकरण करण्याचे गोड आश्वासन दिले होते. त्यानंतरही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेवून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ता. दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर व या भागाचे आमदार राजेश पवार आणि रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी दरम्यान त्यांचे चारचाकी वाहण या रस्त्यावरुन जावू शकले नसल्याने त्यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी व आमदारांना या भागातील नागरिकांना काय त्रास होतो याची जाणीव झाली. नागरिकांच्या भावना लक्षात घेवून लवकरच या रस्त्याचे चांगले काम करु असे आश्वासनही मिळाले. मात्र या रस्त्याच्या कामाला आजपर्यंत मुहूर्त सापडला नाही. रस्त्याची दुरावस्था जैसे थे च आहे त्यामुळे जिल्हाधिकारी व आमदारांचा दौरा केवळ स्टंटबाजी तर नव्हती ना असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.येत्या

आठ दिवसांत कामाला सुरुवात

त्या रस्त्यावर मोठे खड्डे असून सध्याचे काम फक्त दुरुस्तीचे आहे एवढ्या बजेटमध्ये काय होण शक्य नाही. त्यामुळे मी वाढीव रक्कम मागितली असून त्यासाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा चालू आहे. येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात होईल. 

- आ. राजेश पवार, नायगाव विधानसभा.

संपादन- प्रल्हाद कांबळे