
Crime News : मोबाईल, मंगळसुत्र, दुचाकीची घ्या काळजी...
नांदेड : नागरिकांनी मोबाईल, मंगळसुत्र आणि दुचाकीची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण मोबाईल, दुचाकीकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी चोरटे लगेचच चोरी करून गायब होत आहेत.
दुचाकी, मंगळसुत्र आणि मोबाईल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले असून याबाबत नागरिकांसह पोलिसही हैराण झाले आहेत. मध्यंतरी पोलिसांनी दुचाकी, मंगळसुत्र व मोबाईल चोरीचा उलगडा करून त्या संबंधितांना परतही दिल्या होत्या. तरी देखील पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे.
बालाजीनगर येथील मदनसिंग शितलसिंग ठाकूर (वय ६५) यांचे निर्मला किराणा दुकान आहे. त्यांनी घरातील हॉलमध्ये मोबाईल ठेवला होता तर दुसरा मोबाईल बेडरूममध्ये होता. चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून १७ हजाराचे हे दोन मोबाईल आणि किरणा दुकानातील गल्ल्यात ठेवलेले रोख १५ हजार असा ३२ हजाराचा ऐवज चोरून नेला.
याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत वसरणीतील वसंतनगर येथील नाईक इन्स्टिट्यूट येथील हॉलमध्ये विद्यार्थी ऋषिकेश रामकिशोर पवार (वय २२, रा. कलामंदिर) हा परिक्षा देण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने त्याच्या बॅगमध्ये त्याचा ६५ हजाराचा मोबाईल ठेवला. परिक्षा देऊन परत आल्यानंतर त्याच्या बॅगमधील मोबाईल चोरून नेल्याचे लक्षात आले. याबाबत नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुध डेअरी ते धनेगाव रस्त्यावर गौरव बियर शॉपीच्या समोरील रस्त्यावरून ट्रक मेकॅनिक अफरोज शेख (रा. पाकिजानगर) आणि त्याचा मालक हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून पाठीमागून येऊन चोरट्यांनी अफरोज शेख याच्या हातातील दहा हजाराचा मोबाईल हिसकाऊन घेऊन जबरीने चोरून नेला. याबाबत नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतवारा भागात इस्लामपुरा भागात आमेर चाऊस यांनी त्यांची ५० हजाराची दुचाकी (एमएच ०१ - एवाय ४९५५) घरासमोर उभी केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुसऱ्या घटनेत धर्माबादला आनंद हॉस्पीटलच्या रस्त्यावर शेतकरी हर्षवर्धन संभाजी देवके (वय ४५, रा. रोशनगाव) यांनी त्यांची ४५ हजाराची दुचाकी उभी केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत धर्माबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांनीही दक्ष राहण्याची गरज
एकट्या चालत असलेल्या किंवा दुचाकीवर असलेल्या महिलांना थांबवून पत्ता किंवा इतर माहिती विचारण्याच बहाणा करून नंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र, गंठण, सोनसाखळीला हिसका देऊन चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या मकरसंक्राती आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे महिलांनी देखील काळजी घ्यावी तसेच दक्ष राहण्याची गरज आहे.