Nanded Crime Newsनांदेडात पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nanded Crime News : नांदेडात पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन

नांदेड : पोलिस विभागातर्फे नांदेड शहरात सोमवारी (ता. २१) पहाटे चार ते सकाळी नऊ या वेळेत कोबिंग आॅपरेशन करण्यात आले. यात स्वतः पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सहभागी झाले होते. या मोहिमेत पोलिसांनी तीन पथकाद्वारे तपासणी करत चार तलवार, एक पिस्टल आणि एक खंजर जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन बेवारस वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. यापुढे देखील कोबिंग आॅपरेशन सातत्याने राबविण्यात येणार आहे.

पोलिस विभागातर्फे विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, अवैध शस्त्र, बंदुक बाळगणारे, फरार आरोपींचा शोध, समन्स, वॉरंट, पोटगी वॉरंट व गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवारी मध्यरात्री कोबिंग आॅपरेशन राबविण्याबाबत आदेशित करून ते स्वतः देखील हजर झाले होते. शहरातील सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यासाठी एक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पथके तयार करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून कोबिंग आॅपरेशन राबविण्यात आले.

कोबिंग आॅपरेशन दरम्यान माली गुन्ह्यातील आरोपी (दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करणारे) एकूण ७० आरोपी तपासून त्यांची झडती घेण्यात आली. शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे करणारे एकूम ३५ आरोपी तपासून त्यांची झडती घेण्यात आली. रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी असलेले पाच आरोपी अटक करण्यात आले आहे. तसेच नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी तपासून १३ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.

या आॅपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन तलवारी, दोन गावठी पिस्टल, एक खंजर जप्त करून चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध तीन तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. इतवारा ठाण्याकडून एक तलवार जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. तसेच आॅपरेशन दरम्यान आठ प्रोव्हिशन रेड करून ६४ हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे तीन केस करून दीड हजाराचा दंड वसूल केला असून तीन बेवारस वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पथकाव्दारे तपासणी, झडती

कोबिंग आॅपरेशन शहरातील सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आले. त्यासाठी एकूण पाच उपविभागीय पोलिस अधिकारी, सात पोलिस निरीक्षक, ३४ सहायक पोलिस निरीक्षक, १५० पोलिस अंमलदार, ६० पंच आणि ३० कॅमेरामन असे मनुष्यबळ वापरण्यात आले आहे. या पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी तसेच झडती घेण्यात आली आहे.

यांचा होता सहभाग...

सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, सहायक पोलिस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, सचिन सांगळे, विक्रांत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह शहरातील सहा पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :NanduraNandedpolicecrime