नांदेडात गुन्हेगारीने डोके वर काढले, भाजीपाला विक्रेत्याला लुटले

प्रल्हाद कांबळे
Friday, 10 July 2020

व्यापाऱ्याला खंजरचा धाक दाखविला आणि ५५ हजार रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (ता. नऊ) पहाटे एकच्या सुमारास घडली.

नांदेड : परळीहून एका पीकअप टेम्पोद्वारे हिरवी मिरची पुसदला घेवून जात असतांना टेम्पो नादुरुस्त झाला. नादुरुस्त टेम्पोमधील मिरीची दुसऱ्या वाहनात भरत असतांना सहा चोरट्यांनी तिथे येऊन व्यापाऱ्याला खंजरचा धाक दाखविला आणि ५५ हजार रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (ता. नऊ) पहाटे एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देगलूर नाका परिसरातील रहमेतनगरमधील चांदपाशा अब्दुल हाफिज (वय ३०) हे भाजीपाला व्यापारी आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील मांडवा येथून बोलेरो पिकप टेम्पोद्वारे (एमएच२६-२५४१) शेतकऱ्यांचा शेतीमाल आणून पुसदला नेऊन विकण्यासाठी आणत होते. मात्र त्यांचे वाहन गुरूवारीव पहाटे मुसलमानवाडी ते विद्यापीठ दरम्यान नानकसार गुरुद्वारा कमानी समोर बंद पडले. 

रोख ५५ हजार १५० रुपये लंपास 

यावेळी चांद पाशा यांनी त्या ठिकाणी दुसरे वाहन बोलावून घेतले. बंद वाहनातील मिरची भरत असतांना त्यांच्याजवळ दोन दुचाकीवरुन सहा चोरटे आले. त्यांनी त्यांच्याकडील खंजरचा धाक दाखवून चांद पाशा यांच्याकडील ३५० रुपये, नांदेडहून आणलेल्या वाहनांच्या मागील डीकीत ठेवलेले ४० हजार रुपये व वाहनमालक सलीम यांच्याकडील तीन हजार ९०० रुपये, चालक ओम जाधव यांच्याकडील दोन हजार ९०० रुपये तसेच पिकप टेम्पो चालक भागवत दराडे यांच्याकडे आठ हजार रुपये असे एकूण ५५ हजार १५० रुपये जबरीने काढून घेतले.

हेही वाचापद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम ‘या’ गुरूरत्न पुरस्काराने सन्मानीत होणार

पोलिसांनी एकाला केली अटक

नांदेडहुन आलेल्या या दरोडेखोरांचे चेहरे व्यापाऱ्यांनी ओळखले व ते समोरच्या रस्त्याने दुचाकीवरुन पळाले. त्यातील पल्सर दुचाकी (एमएच२६- वाय-३०२५) आणि बाकीचे तिघे जण पॅशन प्रो नंबर नसलेल्या दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती चांद पाशा यांनी नांदेड ग्रामिण पोलिसांना कळविल्यानंतर या सर्वांच्या मदतीने पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेतला असता मातोश्री कॉलेजजवळ बसलेल्या सहा जणांपैकी एकाला ताब्यात घेतले. मात्र बाकी पाच जण पसार झाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. अटक केलेल्या चोरट्याचे नाव प्रभाकर चिमनाजी थोरात (वय २५) ह. मु. काळेश्‍वर आहे. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट 

त्याची कसुन चौकशी केली असता त्याने पसार झालेले साथिदार राजू हंबर्डे, ईशु हंबर्डे, विकास हटकर आणि इतर दोघांचे नाव सांगितले. शेख चांदपाशा यांच्या फिर्यादीवरुन या सहा जणांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. सांगळे करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, अभीजीत फस्के, पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे आणि सहाय्यक निरीक्षक श्री. थोरात यांनी भेट दिली.  

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यासाठी 80 व्हेंटिलेटर उपलब्ध- खासदार चिखलीकर

यापूर्वीही फळविक्रेत्याची ३० लाखाची लूट

चार महिन्यापूर्वी शहराच्या नमस्कार चौक परिसरातील ज्ञानमाता शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका फळ विक्रेत्यास तलवार व पिस्तुलचा धाक दाखवून ३० लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. या घटनेतील आरोपींना अटक केल्यानंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. पण लंपास करण्यात आलेली रक्कम अद्यापही पोलिसांना वसूल करता आली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded, criminals were beheaded, robbing vegetable sellers nanded news